भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचविण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा, लिडकॉम अर्थात, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ आणि लीडकार बाबू जगजीवनराम चर्मोद्योग विकास महामंडळ यांच्यामध्ये नुकताच समंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली, भारत व्यापारी परिषदेनिमित या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता कोल्हापुरी चप्पल सातासमुद्रापार भरारी घेणार आहे.
शतकापासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक आणि समकालीन डिझाइनशैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जाणार आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने आधुनिक पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची साथ मिळणार आहे. विशेष म्हणजे, कोल्हापुरी चपला पुढील वर्षी फेब्रुवारीपासून प्राडाच्या 40 विक्री केंद्रांमध्ये, तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे. भारतीय कारागिरांच्या अतुलनीय कलेला आधुनिक जगतात योग्य स्थान देण्यासाठी प्राडाची साथ मिळणार आहे. चप्पल हा एक व्यवसाय नसून पारंपरिक अनमोल कला आहे. जागतिक बाजारपेठेत आपली छाप पडेल इतका तिचा दर्जा आहे. आता या सामंजस्य करारामुळे कोल्हापुरी चप्पल जागतिक ब्रॅण्ड बनून सातासमुद्रापार भरारी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. -राजू जाधव
Kolhapuri slippers
will go across the seven seas