पंचवटी : वार्ताहर
मखमलाबाद तालीम फाउंडेशन, मखमलाबाद आणि जय बजरंग तालीम संघ, नाशिक यांच्या वतीने मखमलाबादच्या मातीत गुरुवारी (दि. 2) पार पडलेल्या निकाली कुस्त्यांच्या भव्य दंगलीतील दोन लाखांची मानाची इनामी कुस्ती कोल्हापूरच्या प्रकाश (विशाल) बनकर या पहिलवानाने अक्षय शिंदे यास चीतपट करून जिंकली. हे दोन्ही पहिलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेते आहेत.
आमदार ऍड. राहुल ढिकले यांच्या प्रेरणेने आणि नाशिक शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष तथा मखमलाबाद विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष पहिलवान वाळू काकड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 22 वर्षांपासून मखमलाबादमध्ये या भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन केले जाते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ऍड. राहुल ढिकले, माजी खासदार देवीदास पिंगळे, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, उद्योजक बुधासेठ पानसरे, बाळासाहेब पालवे, बाळासाहेब पिंगळे यांच्यासह गोकुळ घोलप, विष्णुपंत म्हैसधुणे, विलास कड, रंगनाथ थेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, सुभाष काकड, नामदेव पिंगळे, दामोदर मानकर, साहेबराव काकड, रामभाऊ काकड, माणिक गायकवाड, चंद्रकांत काकड, सचिन पिंगळे, योगेश पिंगळे, संजय पिंगळे, पहिलवान भरत काकड, राहुल काकड, सागर गायकवाड आदी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन कुस्तीचा आनंद लुटला आणि नावाजलेल्या पहिलवानांना प्रोत्साहन दिले.
कुस्तीविजेत्यांसाठी अगदी पाच हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचे इनाम ठेवण्यात आले होते. यावेळी पार पडलेली मानाची कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दोन लाख इनाम असलेली ही कुस्ती प्रकाश बनकर आणि अक्षय शिंदे या दोन महाराष्ट्र केसरी उपविजेत्यांमध्ये रंगली. अटीतटीच्या लढतीत प्रकाश बनकरने अक्षय शिंदेला चीतपट करीत बाजी मारली. यासाठी दिवंगत आमदार उत्तमराव ढिकले यांच्या स्मरणार्थ आमदार राहुल ढिकले यांच्यातर्फे एक लाख तर दिवंगत बंडू पाटील-पिंगळे यांच्या स्मरणार्थ परफेक्ट डाळिंब मार्केटचे बापूशेठ पिंगळे यांच्यातर्फे एक लाख रुपये असे दोन लाखांचे बक्षीस असलेली इनामी कुस्ती प्रकाश बनकर याने जिंकली. पंच म्हणून पहिलवान वाळू काकड यांनी काम पाहिले. अन्य कुस्त्यांमध्ये बाळू बोडके, संदीप निकम, उदय काकड, मंथन काकड, माऊली गायकवाड, सागर चौगुले, ओमकार फरतडे आदी पहिलवानांनी चांगल्या कुस्त्या करत बाजी मारली. आयोजक वाळू काकड यांनी आभार मानले.