पिसोराबारीत दरड कोसळली

लोखंडी जाळी बसवण्याची आदिवासी बांधवांची मागणी

डांगसौंदाणे : प्रतिनिधी
सटाणा-साल्हेर रस्त्यादरम्यान असलेल्या पिसोराबारी घाटात अचानक दरड कोसळल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने अनर्थ टळला. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घाटातील धोके लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक आदिवासी समाज बांधव करत आहेत.
सटाणा-जोरण-कपालेश्वर-भिलदर-मोरकुरे-पठावे-पिसोरे-मोठे महारदर-साल्हेर-मानूरमार्गे थेट गुजरातला जोडणार्‍या या रस्त्यासाठी साधारण दहा कोटी रुपये खर्चून मागील वर्षी या घाटाचे काम केले होते. हा मार्ग सटाण्याहून साल्हेरकडे जाण्यासाठी अत्यंत जवळचा पर्याय ठरत आहे. मात्र, घाटातील डोंगरकडे आणि माती सैल झाल्याने ती केव्हाही वाहनांवर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
आदिवासी बांधवांच्या मते, या घाटाची चढण जास्त आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 37 मीटर घाटाचे काम केले असले, तरी पिसोरा बाजूकडून आणखी 8 ते 10 मीटर घाट कटिंग करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास येथून एसटी बस व मोठी वाहने सहज धावू शकतील.
सध्या घाटाची रुंदी कमी असल्याने एकाच वेळी 2 ते 3 वाहने समोरासमोर आल्यास मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे वाहतूकयोग्य करावा आणि सुरक्षिततेसाठी घाटात लोखंडी जाळी बसवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाळीचा प्रस्ताव पाठवणार : अभियंता पाटील

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शेखर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पिसोराबारीत कोसळलेले दगड व ढिगारा लवकरात लवकर हटवून रस्ता मोकळा केला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच भविष्यात दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी घाटात लोखंडी जाळी बसवण्याचा सविस्तर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Landslide at Pisorabari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *