संपादकीय

स्व. बाळासाहेब ठाकरे : असा नेता होणे नाही!

जो शून्यातून विश्व निर्माण करतो, इतिहासात त्याचेच नाव सोनेरी अक्षरांनी लिहिले जाते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे असेच एक अजरामर व्यक्तिमत्त्व. 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी माणसांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे पाहून त्यांचे रक्त सळसळले आणि शिवसेना या संघटनेची स्थापना करून त्यांनी मराठी माणसांचे स्फुलिंग चेतवले. मराठ्यांना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्यासाठी मानसिक बळ देण्याचे महत्कार्य त्यावेळी
बाळासाहेबांनी केले.
राज्यात मराठी आणि देशपातळीवर ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा त्यांच्यासारखा एकही नेता ना कधी झाला, ना भविष्यात कोणी होईल. माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे आज दोन तुकडे झाले असले तरी बाळासाहेबांचा दरारा आणि त्यांच्याप्रतिचा आदर जनमानसांत आजही कायम आहे हे दोन्ही शिवसेना पक्षांना महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशावरून लक्षात येते.
1950 मध्ये फ्री प्रेस जर्नल या नियतकालिकाच्या समूहामध्ये बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून नोकरीला लागले. सामाजिक प्रश्नांना व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाचा फोडण्याची त्यांची खुबी काही काळातच जनमानसांना भावू लागली. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे. पुढे नोकरी सोडून त्यांनी 1960 मध्ये स्वतःचे मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. समाजात घडणार्‍या घटनांवर ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाष्य करू लागले. त्यावेळचे ते पहिले व्यंगचित्रात्मक साप्ताहिक होते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊनही मुंबईत मराठी माणसांना दिली जाणारी सापत्न वागणूक त्यांना अस्वस्थ करत होती. मराठी माणसांवर होणार्‍या अत्याचारांना त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाचा फोडली.
मराठी माणसांना त्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी मार्मिकच्या माध्यमातून केली. अल्पावधीतच मार्मिकचा जसा खप वाढला तसा मराठी माणूस जागा होऊ लागला. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या हाताला रोजगार नव्हता. सामाजिक विषमतेला मराठी माणूस बळी पडत होता. मराठी माणसात अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची क्षमता आहे. मात्र, त्याला कुशल नेतृत्व नसल्याने तो विखुरला गेला आहे हे लक्षात आल्यावर 1966 मध्ये बाळासाहेबांनी शिवसेना या मराठी अस्मितेसाठी लढा देणार्‍या संघटनेची स्थापना केली. 30 ऑक्टोबर 1966 या दिवशी शिवसेनेचा पहिला मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. ज्याला पाच लाखांहून अधिक मराठी माणसांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून बाळासाहेबांचे नाव देशभरात प्रसिद्ध झाले. 1966 पासून आजतागायत शिवाजी पार्कचा दसरा मेळावा आणि एकनिष्ठ मराठी माणसांची गर्दी हे समीकरण अबाधित राहिले आहे. आज बाळासाहेब आपल्यात नसले तरी शिवसेनेवर प्रेम करणारे संघटनानिष्ठ शिवसैनिक आजही जनमानसांत आहेत.
राज्यस्तरावर मराठी आणि राष्ट्रीयस्तरावर हिंदुत्व हे धोरण शिवसेनेने अवलंबले. मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात प्रवेश करून सत्ताधार्‍यांवर दबाव आणणे आवश्यक आहे, हे ओळखून शिवसेनेने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे सूत्र ठरवून राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत केली. महापालिकेवर भगवा फडकला. तेव्हापासून मधला काही काळ वगळता मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा सदैव डौलाने फडकत राहिला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आज जोरदार रस्सीखेच सुरू आहे. येत्या काही दिवसांत महापौर कोण होणार हे लक्षात येईलच, मात्र महापौर कोणत्याही पक्षाचा झाला तरी त्याला शिवसेनेचा आधार हा घ्यावाच लागेल हे मात्र निश्चित आहे. 1995 मध्ये भारतीय जनता पार्टीसोबत युती करून बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या रूपाने शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री राज्यावर बसवला. शिवसेनेच्या नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत विजयी करून बाळासाहेबांनी काही खासदारही लोकसभेत पाठवले. 1989 मध्ये बाळासाहेबांनी सामना हे शिवसेनेचे मुखपत्र म्हणून दैनिक सुरू केले.
महाराष्ट्रात राहून देशभरातील हिंदूंना त्या काळी त्यांचा आधार होता. आज रामजन्मभूमी अयोध्येत उभे राहिलेले श्रीरामांचे भव्य मंदिर हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. बाळासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी ते पूर्ण झाले. बाबरी मशीद जर माझ्या शिवसैनिकाने पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान आहे, अशी स्पष्ट भूमिका घेऊन त्यांनी ज्वलंत हिंदुत्व म्हणजे काय असते हे हिंदुत्ववादी म्हणवून घेणार्‍या आणि पक्षांना आणि संघटनांना त्यांनी दाखवून दिले होते. अमरनाथ यात्रा रोखू पाहणार्‍या अतिरेक्यांना बाळासाहेबांनी मुंबईतून ठणकावल्यानंतर अतिरेकीही वरमले होते, एवढा दरारा त्यांनी निर्माण केला होता. देशावर प्रेम करणारा प्रत्येक मुसलमान माझा आहे, असे म्हणून त्यांनी देशप्रेमी मुसलमानांनाही संरक्षण दिले होते. कोणत्याही राजकीय पदाचा मोह न बाळगणारे बाळासाहेब ‘मातोश्री’वर येणार्‍या प्रत्येक पाहुण्याशी राजकारण सोडून बोलत होते. त्यामुळे दर्यादिल माणूस म्हणूनही त्यांची ख्याती आहे. 17 नोव्हेंबर 2012 या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. कोणाचीही भीडभाड न बाळगता आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहून राजकारण करणारा असा नेता पुन्हा होणे नाही.

Late Balasaheb Thackeray: There is no such thing as a leader!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

4 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

4 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

5 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

5 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

5 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

5 hours ago