वन कर्मचार्यांसह सहा जण जखमी
♦ दोन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद ♦ नाशिक जिल्हा बिबट्याचा बालेकिल्ला!
सिडको ः विशेष प्रतिनिधी
’नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांमुळे आता नाशिकची नवी ओळख ‘बिबट्याचा बालेकिल्ला’ अशी होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील विविध भागांत बिबट्यांचे वारंवार दर्शन, हल्ले व बालकांना पळवून नेण्याच्या घटना समोर येत असतानाच शुक्रवारी (दि.14) सकाळपासून गंगापूर रोड परिसरातील संत कबीरनगर-वनविहार कॉलनीजवळील दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. बिबट्याने हल्ला चढवून पाच ते सहा जणांना जखमी केले. परिसरात बिबट्या असल्याची माहितीही नागरिकांनी दिल्यानंतर तातडीने वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला दोन तासांच्या मेहनतीनंतर वन विभागाने डार्टगनद्वारे औषध देऊन बिबट्याला बेशुद्ध करत जेरबंद केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. रेस्क्यूदरम्यान आक्रमक झालेल्या बिबट्याने एका वन कर्मचार्यावर झडप घालून त्याला गंभीर जखमी केले.आणखी तिघांंवर हल्ला झाला असून, सर्व जखमींना खासगी व जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षक संतोष बोडके, प्रवीण गोलाई, राहुल देवरे यांच्यासह सहा जण जखमी झाले आहेत.
भरवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि वन विभागाने तातडीने बंदोबस्त वाढवला असून, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
बघ्यांची तोबा गर्दी
रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळल्याने ऑपरेशनमध्ये व्यत्यय येत होता. अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. राज्यभर बिबट्यांच्या हल्ल्यांची मालिका वाढत असताना सरकार नागरिकांना वार्यावर सोडत आहे का? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. निदान बिबट्याचा हल्ला झाल्यास त्यापासून बचाव कसा करावा, कोणत्या काळजीच्या उपाययोजना कराव्यात याबाबत जनजागृतीचे फलक व बॅनर लावावेत, अशीदेखील मागणी करण्यात येत आहे.
…अन् बिबट्याला केले बेशुद्ध
पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवून रेस्क्यू टीमला मदत केली. त्यानंतर एका घरामागील मोकळ्या जागेत वन्यजीव पशुवैद्यकांनी ट्रँक्विलायझेशन गनने बिबट्याला बेशुद्ध केले. बिबट्या पूर्णपणे शांत झोपेत गेल्यानंतर त्याला सुरक्षित पिंजर्यात ठेवून वन्यप्राणी उपचार केंद्र, म्हसरूळ येथे हलविण्यात आले. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पश्चिम नाशिक वन विभाग, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन आणि नाशिक शहर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा संयुक्त सहभाग होता. तातडीने व समन्वयाने केलेल्या या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले वन विभागाचे कर्मचारी.
जखमींची नावे
तुषार रामदास आचारी, वय वर्षे 22, बबन बाजीराव शिंदे, वय वर्षे 65, रंगनाथ महादू दाबल, वय वर्षे 46, सर्व राहणार: संत कबीर नगर, भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे, शिंदे चाळ, राहुल धर्मराज देवरे, वय वर्षे 47, पाईपलाईन रोड, नाशिक.
आमदार सीमा हिरेंसह अनेक लोकप्रतिनिधीही घटनास्थळी
संत कबीरनगर भागात शुक्रवारी बिबट्या आल्याचे समजताच शहरातील अनेक लोकप्रतिनिधींनी येथे धाव घेत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आमदार सीमा हिरे, हिमगौरी आडके, शिवाजी गांगुर्डे, रश्मी हिरे-बेंडाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, विनोद येवले आदी उपस्थित होते.
वनविहार कॉलनीत बिबट्याचा ‘विहार’
पोलिस आयुक्तांसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किशोर काळे, पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे, विश्वास पाटील, मधुकर कड, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खैरनार यांच्यासह वन विभागाचे उपवनसंरक्षक निर्मळ यांच्यासह पोलिसांचे पथक दाखल झाले होते. यावेळी संबंधित ठिकाणी नागरिकांनी खूप गर्दी केल्यामुळे पोलिसांना, तसेच कर्मचार्यांना जमाव कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

संयुक्त रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी
परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या गर्दी, गोंगाट आणि गोंधळामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले होते. दरम्यान, सैरावैरा पळणार्या बिबट्याने हल्ला चढवून वन विभागाचे दोन, तसेच चार ते पाच नागरिकही जखमी झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

विलास शिंदे यांनी केली जखमींची विचारपूस
महात्मानगर परिसरात अचानक बिबट्या आल्याने तेथील स्थानिक नागरिकांंनी तातडीने प्रभागाचे माजी नगरसेवक विलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला व पोलिस प्रशासन व वनविभागाला फोन करून स्वतः पोहचले. बिबट्याच्या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत. या प्रसंगानंतर तत्काळ परिस्थितीची पाहणी करत, जखमी नागरिकांची तब्येत जाणून घेण्यासाठी शिंदे यांनी दवाखान्यातही भेट दिली. त्यांनी प्रत्येक जखमी नागरिकाची विचारपूस करून त्यांना धीर देत त्यांच्या उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली तसेच आवश्यक ती मदत करण्याचे आदेश वन विभागाला दिले.
जखमींचा खर्च शासन करणार
नाशिक : संत कबीरनगर भागात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांसह वन कर्मचार्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या जखमींचा खर्च शासन करेल, असे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. बिबट्याच्या हल्ल्यात वन कर्मचार्यांबरोबरच पाच ते सहाजण जखमी झाले आहेत. हे जखमी सद्या उपचारासाठी श्रीगुरूजी रुग्णालयात दाखल झालेले आहेत. तर काही जण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बिबटया चवताळल्याने त्याने काही नागरिकांवर हल्ला केला. त्यात नागरिक जखमी झाले.

मी दुकानात बसलेले होते. सासूबाई बाहेर उभ्या होत्या. माझ्या सासूबाईंच्या बिबट्याने जवळून झेप घेतली. त्यांना तातडीने मागे ओढले व दुकान बंद करून घेतले. तासभर आम्ही दुकानातच बसून होतो.
– दीपिशा निकम (प्रत्यक्षदर्शी)