अनेक तास पाण्यात जिवासाठी संघर्ष
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील खंबाळे शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्या मादीला वनविभागाच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. पहाटेपासून विहिरीतील पाण्यात पोहत जीव वाचवण्यासाठी संघर्ष करणार्या बिबट्याला अखेर पिंजर्याच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.
खंबाळे शिवारातील लक्ष्मण कचरू दौंड यांच्या गट क्रमांक 211 मधील दगडी विहिरीत ही घटना घडली. विहिरीभोवती मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून, कठडे नसल्याने शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असावा.
सकाळी शेतकर्यांना विहिरीत बिबट्या पाण्यात पोहत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तानाजी भुजबळ, प्रीतेश सरोदे तसेच वनरक्षक एन. बी. निकम, फैज अली सय्यद, आकाश रूपवते, गोविंद पंढरे, सचिन आहेर, रोहित लोणारे, निखिल वैद्य, ऋषी गोफणे व देवीदास मेंगाळ यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
रेस्क्यू मोहिमेदरम्यान विहिरीभोवती वाढलेले गवत कापून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास छोटा पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. पाण्यात पोहून थकलेल्या बिबट्याने काही मिनिटांतच पिंजर्यात प्रवेश केला. त्यानंतर पिंजरा बाहेर काढून बिबट्या मादीला मोहदरी वनोद्यानात हलवण्यात आले.
सुमारे 50 फूट खोल विहिरीत 14 फूट पाणी असल्याने बिबट्याला सतत पोहत राहावे लागत होते. दम लागल्यानंतर ती विहिरीतील पाइपचा आधार घेत काही काळ विश्रांती घेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक तास सुरू असलेल्या या संघर्षानंतर अखेर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जीवदान दिले.
Leopard that fell into a well in Khambale Shivara safely rescued