नाशिकरोडला भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

नाशिकरोड : वार्ताहर
सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा 2625 वा जन्मकल्याणक दिन नाशिकरोडला विविध उपक्रमांनी अतिशय उत्साहात जैन बांधवांनी साजरा केला. येथे मंदिर मार्गी जैन, दिगंबर व श्वेतांबर जैन असे तीनही पंथांचे जैन बांधव राहत असून, त्यांची मंदिरे आहेत. या तीनही पंथांचे सर्व जैन बांधव एकदिलाने भगवान महावीर स्वामींच्या या जन्मकल्याणक दिन सोहळ्यात एकत्र आले होते.
दुर्गा उद्यानासमोरील जैन स्थानकातून भगवान महावीरांच्या प्रतिमेसह ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा प्रातःकाळी काढण्यात आली. ती आर्टिलरी सेंटर रोडवरील दिगंबर पंथाच्या मंदिरावरून खोले मळ्यातील श्वेतांबर पंथाच्या मंदिरापर्यंत व तेथून लिंगायत कॉलनी, देवळालीगावमार्गे सुभाषरोडने डॉ.आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको पॉइंटवरून जैन स्थानकात अतिशय उत्साहात आली. यात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. मिठाई, पाणी वाटप करण्यात आले. जैन स्थानकात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. तेथे मंत्री गिरीश महाजन यांनी भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्ताने मनोगत व्यक्त करत जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांचे डॉ. किरणमल धाडीवाल, डॉ. राजेंद्र मंडलेचा, विनय भंडारी यांनी हृद्य स्वागत केले. प.पू. मधुस्मिताजी म.सा., प.पू. सम्बोधिजी म.सा. व प.पू. हिमप्रीतीजी म.सा. यांचीही प्रवचने झाली. त्यानंतर दुपारी सर्व जैन समाजबांधवांनी जैन भवनात गौतमी प्रसादाचा लाभ घेतला. अतिशय उत्साहात पण तितक्याच शांततेत हा कार्यक्रम झाला. मिरवणूक निघालेल्या रस्त्यावर कुठेही कचरा अगर पाण्याच्या बाटल्या टाकण्यात आल्या नव्हत्या. हा आदर्श या मिरवणुकीने इतरांसमोर घालून
दिला आहे.

Lord Mahavir Jayanti celebrated with enthusiasm on Nashik Road

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *