सिंहस्थ कुंभमेळा म्हटले की, डोळ्यासमोर उभा राहतो तो गोदाकाठाचा रम्य परिसर! केवळ नाशिकच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपर्यांतून दाखल होणारे भाविक, संत-महंत, साधूगण आणि आबालवृद्ध! गोदावरीच्या पवित्र जलामध्ये घेतले जाणारे शाहीस्नान. तपोवन येथील देश-विदेशातून येणारे योगी व महात्मे यांच्यासाठी साधुग्राममध्ये करण्यात आलेली जय्यत तयारी. अशा विविध रंगांनी नटलेल्या कुंभमेळ्याचे इंद्रधनुष्यी दृश्य पुन्हा एकदा बघायला मिळणार या विचाराने मी आतापासूनच अति आनंदित झालो आहे.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही त्रिसूत्री म्हणजे भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक कोनशिलेचे तीन प्रमुख स्तंभ आहेत. ब्रह्मदेव हे जन्म व मृत्यूचे कारक व सृष्टीच्या उत्पत्तीचे जनक म्हणून ओळखले जातात. लक्ष्मीपती आणि क्षीरसागरामध्ये वास्तवात असलेले भगवान विष्णू भारतीयांचे आद्य दैवत आहेत. ज्यांच्या वर्णनाने व सान्निध्याने संपूर्ण हिंदू धर्माला सार्थ अभिमान वाटतो असे देवाधिदेव महादेव यांना अर्घ्य अर्पण करण्यासाठी सिंहस्थाची पर्वणी आपण साधतो.
समुद्रमंथनावेळी देव आणि दानव यांच्यात तुंबळ युद्ध सुरू होते. अमृतप्राप्तीसाठी दोघांमध्ये चढाओढ सुरू होती. त्यावेळी असुरांपासून अमृताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नकळत देवांना अमृताची प्राप्ती व्हावी यासाठी जेव्हा गरुडदेव समुद्रमंथनातून उत्पन्न झालेला अमृतकलश आकाशमार्गाने नेत होते तेव्हा त्यातून काही थेंब भारतातील ज्या ज्या नद्यांच्या पात्रात पडले तेथे तेथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरविला जाण्याची आख्यायिका भारतीय पुराणशास्त्रात आढळून येते.
आख्यायिकेला प्रमाण मानूनच आपल्या महाराष्ट्रात नाशिक शहरात गोदावरी नदीकिनारी दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. याआधी 2015 साली नाशिक येथे आयोजित झालेल्या सिंहस्थाचा मी जवळून पाहिलेला देखावा आपल्याला कथन करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी इथे करीत आहे.
सर्वप्रथम सुंदरनारायण मंदिराच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पायर्यांनी खाली उतरत मी एकमुखी दत्तमंदिर पटांगणात प्रवेश केला. संध्याकाळची वेळ असल्याने आणि बर्यापेकी अंधार असल्याने विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. तेथून रामकुंडापर्यंत पायी जात असताना मला असे दिसले की, प्रत्येक कुंड स्नान करणार्या भाविकांनी तुडुंब भरले होते आणि मंत्रोच्चाराच्या व पुष्पवृष्टीच्या जयघोषात अवघा आसमंत दणाणून गेला होता. तेथून पुढे शयनी हनुमानापर्यंतच्या मोकळ्या जागेत वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या अँटेनायुक्त व्हॅन या कुंभमेळ्याचे लाइव्ह चित्रीकरण करण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करीत होत्या.त्यांच्या कॅमेर्यांमध्ये आपणही कैद व्हावे आणि राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या स्क्रिनवर झळकण्याची संधी मिळावी याची चढाओढ रामकुंडाच्या पात्रात स्नान करीत असलेल्या काही तरुणांमध्ये सुरू होती. तेथून थोडेसे पुढे गेल्यावर कपालेश्वर मंदिरापासून ते सांडव्यावरच्या देवी मंदिरामार्गे थेट काळाराम मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर मुंगी शिरण्याइतकीही जागा नव्हती. त्यातून मार्गक्रमण करण्याची अवघड किमया साधत मी प्रत्येक देखावा मनमुरादपणे डोळ्यांत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो.
इतक्या भयंकर गर्दीतही संपूर्ण कुंभमेळ्याचा देखावा अतिशय विहंगम व विलोभनीय होता.प्रचंड गर्दीमुळे कुठेही कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याकरिता उभारण्यात आलेल्या संरक्षण यंत्रणेने उत्कृष्टपणे आपली कामगिरी चोखपणे पार पाडली होती. बाहेरगावाहून तसेच इतर राज्यांतून आलेल्या भाविकांपैकी कोणाच्याही नातेवाइकांचा किंवा आप्तजनांचा एकमेकांशी संपर्क तुटल्यास त्यासाठी करण्यात आलेल्या ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या वापरामुळे भरपूर मदत झाली. तसेच कुंभमेळ्यादरम्यान काहीही अनुचित घटना घडू नये यासाठीदेखील सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते. तेथून पुढे पंचवटी, कपिला संगम, आणि काळाराम मंदिर परिसरात श्री काळारामाचे दर्शन घेऊन घराकडे परतीच्या मार्गाला मार्गस्थ होऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीला पूर्णविराम दिला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीला यापेक्षाही चांगला व सुखद अनुभव येणार याची मला मनोमन खात्री आहे. तेव्हा आपणही प्रत्येक जण ’बम् बम् भोले’च्या गजरात न्हाऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीचा आनंद घ्यावा, हेच मला आपणा सर्वांना सांगायचे आहे.
Bum Bum Bhole! Alkh Niranjan!!