नाशिक : प्रतिनिधी
द्वारका परिसरात असलेल्या श्री श्री राधा मदनगोपाल मंदिर (इस्कॉन) येथे अक्षय तृतियेपासून चंदनयात्रेला प्रारंभ झाला. पुढील 21 दिवस हा उत्सव चालणार आहे.
या काळात सूर्याच्या उष्णतेत वाढ होऊन वातावरणात उन्हाची तीव्रता जाणवते. उन्हाच्या तीव्रतेपासून भगवंतांना शीतलता मिळावी, या भावनेतून भक्त भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहांवर चंदनाचा लेप लावतात. अक्षयतृतीयेपासून 21 दिवस चालणार्या या उत्सवात रोज भगवान श्रीकृष्णाचा शृंगार करताना पुजारी विग्रहांवर चंदनाचे लेपण करतात. त्यासाठी सर्व भक्त रोज सकाळी चंदन उगाळून ते भगवंतांच्या सेवेत अर्पण करणार आहेत.
या सेवेसाठी सर्व वयोगटातील भक्त उत्साहाने सहभागी होतात. हा उत्सव वृंदावन व जगन्नाथपुरी येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सोबतच जगभरातील सर्व इस्कॉन मंदिरांत केला जातो. नाशिककरांनी उत्सवात सहभागी होऊन विशेष दर्शनासाठी मंदिराला भेट द्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.