मदतीसाठी तत्पर तरूणाई
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात त्याची जडणघडण होते. ज्या समाजात आपण राहतो त्याचे आपण देणे लागतो ही भावना जेव्हा मनात रुजते तेव्हा समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती तयार होते आणि आपोआपच माणुसकीची जपवणूक होतांना दिसते. तसेच कुटुंबातील संस्कारही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतच असतात.सोशल मिडीयामुळे आजचा तरुण वर्ग बिघडला आहे. अशी सर्वत्र ओरड ऐकू येते. काही प्रमाणात ते खरेही आहे पण नाण्याला दुसरी बाजू असतेच ना! तरूणांमध्ये सळसळता उत्साह असतो.त्याच्यातील क्षमतेला विधायक कार्याकडे वळवले तर समाजात तरुणांच्या बाबतीत सकारात्मक परिणाम दिसून येतात.अशी आजची तरुणाई मदतीसाठी तेवढीच तत्पर असल्याचेही दिसून येते.
एखाद्या ठिकाणी अपघात झाला किंवा अचानक काही समस्या निर्माण झाली तर काही अपवाद वगळता तरूण वर्ग पटकण धाव घेतो.समस्या निराकरणाचे प्रयत्न केले जातात.कोरोना महामारीच्या काळात तरुणांच्या गटांनी बेरोजगार झालेल्या लोकांना गावी परतण्यासाठी मदत केली.त्यांच्या अन्नपाण्याची ,निवासाची जागोजागी व्यवस्था केली. आजारी व्यक्तींना दवाखान्यात उपचारासाठी सहकार्य केले ते करतांना काहीजण तर आजाराचे शिकार झाले. एक दिवस स्कुटीने शाळेतून घरी जात होते.रस्त्याचे काम चालू असल्याने दोन्ही बाजूने ट्रॅफिक जॅम होती.मला रस्ता क्रॉस करायचा होता पण रस्ता क्रॉस करता येईल असे अजिबात शक्य वाटत नव्हते.दहा मिनिटे रखरखत्या उन्हात उभी होते.काही अंतरावर असलेला एक तरुण हे पहात होता.तो मला ओळखत नव्हता तरी पण जवळ आला आणि मला म्हटला की मॅडम मी गाड्या थांबवतो तुम्ही पटकण तुमची गाडी क्रॉस करून घ्या.तो रस्त्याच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला आणि काही क्षण दोन्ही बाजूच्या गाड्या थांबवल्या.मला हायसे वाटले.एवढ्या घाईत मला त्याचे आभारही मानता आले नाही.मनोमन माणुसकीचे दर्शन झाले. असेच एकदा अचानक रस्त्याने जात असतांना गाडीतले पेट्रोल संपले आणि गाडी बंद पडली.पेट्रोलपंपही जरा लांब होता.मी रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली आणि विचार करत होते आता काय करावे बरे.. तेवढ्यात मैत्रिणीचा मुलगा तिथून चालला होता.त्याने त्याची गाडी थांबवली आणि काय झाले म्हणून विचारले.त्याने मला सांगितले की तुम्ही इथेच थांबा मी पेट्रोल घेऊन येतो आणि काही मिनिटांतच तो पेट्रोल घेऊन आला.
घरी असतानाही अचानक काही काम निघाले आणि घरी इतर कुणी नाही अशा वेळी शेजारील अभिजित,प्रज्वल,चेतन काही वस्तू आणून देणे,गाडी बंद पडली तर चालू करून देणे, इत्यादी गोष्टी सहजपणे करतात.यात मुलीही मागे नाही.पूनम,प्रियाला काही सा़ंगताच मदतीला तयार असतात.
आजच्या तरुणाईला गरज आहे दिशा देण्याची, त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्याची,मग ती नक्की तयार होईल समाजाचे आणि देशाचे ऋण फेडण्यास.जसे की समाजसेवेचा वारसा लाभलेले आमटे कुटुंबिय, सिंधुताई सपकाळ यांची पुढील पिढीही हा सेवेचा वारसा जपते आहे.
– सविता दिवटे-चव्हाण, चांदवड