असे म्हणतात प्रेमाने जग जिंकता येते. जिथे सर्व शस्त्रांचा प्रभाव संपतो तिथे प्रेमाचे शस्त्र कामी येते. श्रीकृष्णानेही भगवद्गीतेमध्ये प्रेमाची महती वर्णिली आहे. आपल्या संपूर्ण अवतारकार्यातही भगवंताने प्रेमाचे महत्त्व आपल्या वर्तणुकीतून, प्रसंगांतून दाखवून दिले आहे. भारतीय हिंदू संस्कृतीने तर प्राणिमात्रापासून अगदी निर्जीव वस्तूवरही प्रेम करायला शिकवले आहे.
अशा या प्रेमाची शिकवण देणारा वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. तीळगुळाच्या माध्यमातून प्रेमाची देवाणघेवाण करण्यास शिकविणारी मकरसंक्रांत भारतीय संस्कृतीचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. शरपंजरी पहुडलेल्या पितामह भीष्मांनीही प्राण त्यागण्यासाठी उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहिली होती. हिंदू धर्मातील हा एकमेव सण आहे जो शालिवाहन वर्षानुसार साजरा न करता सौर कालगणनेनुसार साजरा केला जातो.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने या सणाला शेतीविषयक महत्त्वही आहे. आपल्या शेतात आलेले धान्य या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण म्हणून देतात. याचेच रूपांतर आता हळदी-कुंकू समारंभात झाले असून, शहरी भागांत महिला वेगवेगळ्या वस्तू वाण म्हणून देतात. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना तीळगुळाच्या लाडूप्रमाणे प्रेमाच्या नात्यात घट्ट बांधण्याची प्रेरणा देणारा हा सण स्नेहाचे आणि प्रेमाचे आगळे महत्त्व सांगून जातो. एकमेकांना तीळगूळ देताना ’आमचा तीळगूळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका,’ असे बजावून वर्षभर परस्परांशी स्नेहाने वागण्याचा जणू करारच या दिवशी केला जातो. आमच्या लहानपणी मोठ्यांना तीळगूळ देऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेताना पाठीवर पडणारी थाप आम्हा बच्चेकंपनीला वेगळाच आनंद देऊन जाई. तीळगूळ वाटूनही तीळगुळाची वाटी द्रौपदीच्या थाळीप्रमाणे भरलेलीच असे. कारण जेवढा तीळगूळ दिला जायचा तेवढाच पुन्हा वाटत यायचे. तीळगूळ वाटण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ मंडळींकडून होणारे लाड व मिळणारे आशीर्वाद आम्हाला ऊर्जा देत असत.
तीळ हे स्निग्ध असतात. स्निग्ध म्हणजेच स्नेह. या स्नेहाचे गुळासोबत मिश्रण करून ते घट्ट केले जाते. एकमेकांतील स्नेहाचे नाते असेच घट्ट राहावे यासाठीच मकरसंक्रातीच्या दिवशी प्रतीकात्मक तीळगूळ एकमेकांना दिला जातो. तीळ उष्ण असल्याने थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता वाढविण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. त्यासोबत मिश्र केलेला गूळ स्नेहाच्या नात्यातील गोडवा दिवसागणिक वाढत जाण्याची प्रेरणा देतो. मकरसंक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत महिला घरोघरी किंवा सार्वजनिक ठिकाणी हळदी-कुंकू साजरा करतात. एरवी एकमेकांशी भांडणार्या, एकमेकांची उणीधुणी काढणार्या महिला वर्षभरातील सारे हेवेदावे विसरून हळदी-कुंकू साजरे करण्यासाठी एकत्र येतात. एकमेकींना हळद-कुंकू लावून पस्परांतील शक्तीचे पूजन करतात. प्रेमाचे प्रतीक म्हणून तीळगुळासोबत वाण देतात. मकरसंक्रांत हा सण भारताच्या विविध प्रांतांसह नेपाळमध्येही उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी सण साजरा करण्याच्या पद्धती जरी भिन्न असल्या, तरी एकमेकांमध्ये प्रेमाची देवाणघेवाण करणे हाच या सणाचा प्रमुख उद्देश आहे. सध्याच्या धावत्या जगात आपल्या पाल्याचा निभाव लागावा यासाठी पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या किंवा कॉन्व्हेंट शाळांमध्ये घालू लागले आहेत. कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणार्या आजच्या पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. प्रेम व्यक्त करण्याचे दिवस आणि साधनेही आज बदलली आहेत. परंपरागत सणांची जागा आज निरनिराळ्या ’डेज्’ने घेतली आहे. हातभर रिबीन बांधून आणि अंगावर पेनाने रंगवून, चॉकलेट आणि गुलाबाची फुले वाटून प्रेम दर्शवणारी नवीन पिढी सर्वत्र पाहायला मिळते आहे. ज्या पिढीमध्ये ज्येष्ठांसाठी केवळ ’मदर्स डे’, ’फादर्स डे’ तेवढे शिल्लक राहिले आहेत. अशा पिढीला मकरसंक्रांतीतील तीळगुळाचा गोडवा कदाचित कळणारही नाही. त्यांच्यावर आपल्या सणांचे व संस्कृतीचे महत्त्व बिंबवणे आज आवश्यक बनले आहे.
‘Makar Sankranti’ increases mutual affection
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…