मालेगाव मनपा आयुक्त यांच्यासह दोघे लाच लुचपतच्या जाळ्यात 

मालेगाव मनपा आयुक्त यांच्यासह दोघे लाच लुचपतच्या जाळ्यात

कंत्राटदाराच्या बिलांसाठी  मागितली ८० हजार रुपयांची लाच

नाशिक : प्रतिनिधी

मालेगाव महानगरपालिकेतील दोन कामांच्या बिलांना मंजुरी देण्यासाठी कंत्राटदाराकडे ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मालेगाव महापालिका आयुक्त यांच्यासह स्वीय सहायक आणि अकाउंटंट अशा तिघांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार कंत्राटदार असून, त्यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रार दिली होती. मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या दोन ठेकेदारांमार्फत केलेल्या कामांची दोन बिले मंजूर करण्यासाठी चार टक्के दराने ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, संबंधित ठेकेदारांनी महानगरपालिकेमार्फत केलेल्या कामांची बिले बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे जमा करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली.

या प्रकरणात  महापालिका आयुक्त रविंद्र जाधव, , स्वीय सहायक नीलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंगबर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तिघांना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *