किरकोळ वादातून एकाच्या गळ्यावर वार; गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात सोमवारी सकाळी किरकोळ वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसरात एका 45 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हलल्यात गोकुळ सुखदेव लोंढे (वय 45, रा. म्हसरूळ) गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, की सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सलगत असलेल्या चहाच्या टपरीजवळ तीन जण जेवण करून बसले होते. त्यांच्यात गप्पा सुरू असताना काही कारणावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोघा संशयितांनी गोकुळ लोंढे यांच्यावर मागून धारदार शस्त्राने हल्ला केला. गळ्यावर वार झाल्याने ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. हल्ल्यानंतर दोन्ही संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, जखमी अवस्थेत लोंढे काही काळ घटनास्थळी पडून असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच विशाल पाटील आणि अरुण गाडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी लोंढे यांना रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणातील फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुना वाद अथवा अन्य कारणांमुळे हा प्रकार घडला का, याचा तपास सुरू आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Man slashed on the neck following a minor dispute; case registered.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *