महाराष्ट्र देशा!
राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा।
नाजूक देशा, कोमल देशा,
फुलांच्याही देशा।
या शब्दांमध्ये कवी गोविंदग्रज यांनी महाराष्ट्राचे वर्णन केले आहे. आज 1 मे आजच्या दिवशी मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याची तुतारी फुंकण्यात आली. शाहिरांनी डफलीवर थाप देत त्यांच्या पहाडी आवाजातील पोवाड्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. ही हाक देत मराठीमन चेतवले होते.
महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दात महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत – महासंत, ऋषी – मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांची आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्म समभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरू, नाना पाटील यांसारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणाचीही पर्वा केली नाही.
आचार्य अत्रे यांची मुलूखमैदान तोफ महाराष्ट्रासाठी धडाडत होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. तेव्हा कुठे 1 मे 1060 ला मराठी भाषिकांचे राज्य देशाच्या नकाशावर अस्तित्वात आले. हुतात्म्यांचे बलिदान विसरून महाराष्ट्र दिन चिरायू होऊ शकत नाही. वर्तमानाने
स्वतःचा इतिहास विसरता कामा नये अस म्हणतात. म्हणून हा केलेला प्रपंच.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 62 वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत असतानाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तिशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुद्धिवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस. एम. जोशी, आचार्य प्र. के. अत्रे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रसाठी एक झाली आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.
एका अदृश्य शक्तीशी महाराष्ट्र दोन हात करत आहे. राज्य शासन या संकटाच्या मगर मिठीतून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी प्रयत्नाची शर्थ करत आहे. महाराष्ट्राविना देशाचा गाडा चालू शकणार नाही असे बोलले जाते. महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. महाराष्ट्राला लाभलेले सुसंस्कृत नेतृत्व व मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव ओळखले जातात. कोयना, उजनी ही महाकाय धरणे महारष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम त्यांनी केले. उद्योगधंद्याची उभारणी करून महाराष्ट्राला औद्योगिक प्रगतीचा पाया त्यांनी रचला. राज्याचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यात हरितक्रांती घडवली. त्यासोबत शिक्षणातही राज्य अग्रेसर केले. शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्यासाठी गोदावरीवर जायकवाडी हे महाकाय धरण बांधले. महाराष्ट्रासाठी संकट ही नवीन नाहीत. पण महाराष्ट्र हा लढवय्या आहे. आलेल्या संकटांचा भंडारा उडवत महाराष्ट्र धर्माचा ध्वज हा डोलाने आसमंतात फडकत आहे. पुढे देखील फडकत राहील. मराठा तितुका मेळावा महाराष्ट्र धर्म वाढवला हीच महाराष्ट्र दिनी अपेक्षा. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन चिरायू होवो.
मृणाल पाटील