गायकवाड : डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाचे नाव बदलल्यास गुन्हा
मनमाड : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालवल्या जाणार्या मनमाड येथील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम या खासगी जागेवर नगरपालिकेने बेकायदेशीररीत्या हक्क सांगून त्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेने या आश्रमाचे नाव बदलून ’प्रेरणाभूमी’ असा जो ठराव केला आहे, तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तो त्वरित रद्द न केल्यास नगरपालिकेवर अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. भविष्यात कायदेशीर कारवाई करणार असल्याचेदेखील गायकवाड यांनी म्हटले आहे.
गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत ठरावाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रमाचे नाव बदलून प्रेरणाभूमी असे करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही जागा पूर्णपणे खासगी मालकीची असून, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम यांच्या नावे आहे. या जागेच्या मालकांची किंवा संस्थेच्या संचालक मंडळाची कोणतीही संमती न घेता नगरपालिकेने हा ठराव संमत केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कॅप्टन गायकवाड यांनी पत्रक काढून पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्यासह इतरांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट व फसवणुकीच्या गुन्ह्याखाली कारवाईचा इशारा दिला आहे. तो ठराव तत्काळ रद्द करावा, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे. याबाबत मुख्याधिकार्यांशी संपर्क साधला असता, आम्ही त्या परिसराला ’प्रेरणाभूमी’ नाव दिले असल्याचे सांगितले. याबाबत स्वतः मुख्याधिकारीदेखील सांशक असल्याचे समजते.
संस्थेचे आक्षेप आणि आरोप
संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
खासगी जागेवर अतिक्रमण : ही जागा खासगी मालकीची असताना, मालकाच्या संमतीशिवाय नाव बदलण्याचा ठराव मांडण्याचा अधिकार नगरपालिकेला नाही. हा ठराव म्हणजे खासगी जागा बळकावण्याचा प्रयत्न आहे.
इतिहास पुसण्याचा कट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे नाव बदलणे म्हणजे इतिहास पुसण्याचे कारस्थान आहे, जे आंबेडकरी जनता कधीही सहन करणार नाही. याशिवाय प्रेरणाभूमीच्या नावाखाली जनतेकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करण्यात आला आहे. या पैशांचा मनमाड नगरपालिकेने अपहार केल्याचा खळबळजनक आरोपही संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
Manmad Municipality’s ‘that’ resolution is illegal