मनमाड : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम या इंधन कंपनीला इंधन वाहतुकीचे रेल्वे रॅक उभे करण्यासाठी रेल्वे साईडिंग व व्हॅगन गॅटरी तयार करायची असून, प्रस्तावित प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी नांदगाव येथून आलेल्या भूसंपादन अधिकार्यांना तसेच कंपनीच्या अधिकार्यांना आमच्या मागण्या पूर्ण करा तरच मोजणी करा, असा सूर लावून धरून येथील शेतकर्यांनी विरोध करीत पळवून लावले.त्यामुळे मोजणी अधिकारी व कंपनीच्या अधिकार्यांना दुसर्यांदा रिकाम्या हाताने परतावे लागले.
हिंदुस्थान पेट्रोलियम
कॉर्पोशन लिमिटेड कंपनीतर्फे उभारण्यात येणार्या प्रकल्पातील जमिनीचा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला तसेच प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकर्या व इतर मागण्यांसंदर्भात जोपर्यंत लेखी करार होत नाही तोपर्यंत आम्ही जमीन मोजणीस विरोध करणार आहोत, अशी भूमिका यावेळी शेतकर्यांनी घेतली. तसेच भूमापन कार्यालयामार्फत व कंपनीतर्फे ज्यांची जमीन मोजणी सुरू करण्यात आली, त्यांना कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना देण्यात आली नाही. जबरदस्तीने मोजणी सुरू करण्यात आली. त्यास आमचा विरोध व हरकत आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमची जमीन द्यायची नाही. यावेळी ग्रामस्थांनी संबंधितांना निवेदन दिले. त्यामुळे काल मंगळवारी पानेवाडीत आलेल्या कंपनीच्या अधिकार्यांना व नांदगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकार्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. यावेळी पानेवाडी येथील संबंधित 45 एकर शेतजमिनी मालकांपैकी वाल्मीक रघुनाथ आहिरे, संजय वाळूबा सांगळे, गोकुळ दादा सांगळे, प्रेमराज दादा सांगळे, दत्तू मोहन सांगळे, रामनाथ दत्तू सांगळे, काळू मोहन सांगळे, दत्तू उत्तम वाघ, दत्तू अशोक काकड, दगडूबाई वाघ आदींसह एचपीसीएलचे अधिकारी अनिल मिश्राम, किरण मैत्र, भूमापन अधिकारी एन. जी. आहिरे, जे. के. शेख, मनमाडचे पोलीस निरीक्षक पी. बी. गिते, उपनिरीक्षक गौतम तायडे आदींसह मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा, कंपनीचे कर्मचारी व शेतकरी
उपस्थित होते.
दरम्यान, इंधन कंपन्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या पानेवाडी शिवारातील न्यू इंग्लिश शाळा शेजारी 14 शेतकर्यांच्या मालकीची असलेली 45 एकर जागेत हिंदुस्थान पेट्रोलियम
कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने सदरची जागा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या वेळेस या कंपन्या येथे आल्या त्यावेळी या कंपनीने प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या कंपनीने पाळले नसल्यामुळे आज या शेतकर्यांची जमीन घेण्यासाठी आले असता त्यांनी ही तीच मागणी लावून धरून आमच्या वारसांना नोकरीला घ्यावे आणि चांगला मोबदला मिळावा तरच आम्ही जमीन देऊ, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आज मोजणीसाठी आलेल्या सर्वांना पळवून लावले. त्यामुळे हा वाद वाढण्याचे चिन्ह यावरून दिसून येत आहे.