मनमाड : नरहरी उंबरे
‘लग्न पहावे करून आणि घर बघावे बांधून..’ अशी एक प्रचलित म्हण आहे. मात्र, लग्नसोहळे साजरे करताना अनेक हाऊस, मऊस होत असली तरी मात्र या सोहळ्याला आमंत्रण देणारी लग्नाची निमंत्रणपत्रिका या सोहळ्यातून लुप्त पावत चालली असल्याने यावर अवलंबून असलेल्या सर्वच व्यावसायिकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.
लग्न म्हटले म्हणजे अनेक बारीकसारीक गोष्टींचे नियोजन करावे लागते. यात लग्नपत्रिका हा महत्त्वाचा भाग मानला जातो. परंतु कोविड काळापासून कमी लोकांमध्ये लग्न लावण्यास शासनाने बंधने घातली. सलग दोन वर्षे अवघ्या शंभर-दोनशे लोकांमध्ये लग्न होऊ लागली. फोनव्दारे आमंत्रण दिले गेले. त्याचा आधार घेत यंदा बहुतांशी वधू-वर पित्यांना लग्नपत्रिका न छापता सोशल मीडिया व दूरध्वनीवरून आमंत्रण दिले. ते लोकांनी स्वीकारत मांडव, हळद, लग्नकार्यास हजेरी लावली. त्यामुळे लग्नपत्रिका छपाई व गावोगावी वाटप करण्यासाठी होणारा इंधनाचा खर्च, ऊन-वारा, वेळ वाचला. पुढील एक-दोन वर्षांत लग्नपत्रिकाच पूर्ण हद्दपार होतील असे जाणकार सांगत आहेत. दरम्यान, पूर्वी लग्नपत्रिकांना खूप महत्त्व होते. पत्रिकेत कुणाकुणाची नावे टाकायची, याचा कच्चा मसुदा तयार करायलाच दोन-चार दिवस निघून जायचे. अनेक वधू-वर पिता पैशांचा विचार न करता आकर्षक व दोन प्रकारच्या पत्रिका छापत असत. लग्नपत्रिकेला विशेष महत्त्व होते आणि त्या सांभाळून ठेवत आपल्याकडे लग्न असले की, यापेक्षा दर्जेदार आपण छापू, असा विचार असायचा. मात्र, तीच लग्नपत्रिका जवळपास हद्दपार झाल्यास जमा आहे. आता सोशल मीडियाचा जमाना असल्याने यंदा बहुतांशी लग्नांचे आमंत्रण हे मोबाइलच्या माध्यमातून देण्यात येत आहे.आणि समाजाने देखील समजूतदारपणा दाखवत लग्नकार्यात सहभाग घेतला. उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने लग्नपत्रिका वाटप करणे जिकिरीचे आहे. याचा परिणाम लग्नपत्रिका छपाई करणार्या व्यावसायिकांवर झाला असून, लग्नपत्रिकेचा धंदाच उरला नाही त्यामुळे या छापल्या जाणार्या लग्नपत्रिकेवर अवलंबून असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.