कर्जबाजारीपणामुळे सोनेवाडी बु.येथील शेतकऱ्याची आत्महत्या

लासलगाव : प्रतिनिधी

सोनेवाडी बु.ता.निफाड येथील द्राक्षे उत्पादक शेतकरी शांताराम सुखदेव पडोळ (वय ५२) यांनी कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.अधिक माहिती अशी की, दोन तीन दिवसांपूर्वी मयत शांताराम पडोळ यांचा विहिरीत मृतदेह आढळून आला.याबाबत निफाड पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.निफाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले असता त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.

कुटूंबियांनी मयत पडोळ यांचे नावे बँक ऑफ बडोदा नैताळे शाखेचे सन २०१६ पासून सुमारे १३ लाख रुपये कर्ज व ३ लाख हातउसने कर्ज असल्याची माहिती दिली. त्यामुळे मयत पडोळ हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते. त्या विवंचनेतूनच त्यांनी जीवनयात्रा संपवली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांचे नावावर चार एकर जमीन असून चारही एकरावर द्राक्षे बागेची लागवड केलेली आहे.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक फटका बसत आहे. त्यातच यावर्षीही अवकाळी पावसाने द्राक्षे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर्षीही द्राक्षे मातीमोल भावात विकावे लागले आहेत. त्यामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे द्राक्षे उत्पादक कर्जबाजारी झाले आहेत. राज्य सरकारने सन २०१६ साली ज्यांनी कर्ज उचल केले आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. दोन लाखापर्यंत कर्जमाफी झाली आहे. दोन लाखांच्या वर ज्यांचे कर्ज आहे असे शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे व्याज अव्वाच्या सव्वा झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून कर्जमाफी बाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *