नाशिक

लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच विवाहितेची आत्महत्या

पंचवटी : प्रतिनिधी
नव्या संसाराची स्वप्ने पाहणार्‍या नवविवाहितेला अवघ्या पाच महिन्यांत विषप्राशन करून आत्महत्या करावी लागल्याची हृदयद्रावक घटना पंचवटीतील हिरावाडीमध्ये घडली आहे. नेहा संतोष पवार असे त्या विवाहितेचे नाव आहे. मृत्यूपूर्वी तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये पती, सासू, नणंदा यांनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाचा पाढा वाचला आहे. पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासास प्रारंभ केला आहे.

शहरात व घराघरांत चंपाषष्ठीनिमित्त खंडेरावाचा जयघोष चालू असताना बुधवारी दुपारी एक वाजता नेहा संतोष पवार (वय 27, रा. साई समृद्धी, सिद्धेश्वरनगर, हिरावाडी) यांनी घरात टेलफॉस नावाचे विषारी औषध सेवन केले. तिला उलट्या होऊ लागल्याने सदगुरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना 4.45 वाजता नेहा हिचे निधन झाले. नेहाने विषप्राशन करण्यापूर्वी सहा
फुलस्केप पानांवर विवाहानंतर सासरी आलेल्या कटू अनुभवांची जंत्रीच मांडली.
हे पत्र पोलिसांच्या व भावाच्या हाती पडावे अन्यथा सासरचे लोक फाडून टाकतील या भीतीने तिने फोटो काढून भावाच्या मोबाइलवर पाठवले होते. त्यामुळे या दुर्देवी घटनेची वाच्यता झाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती आमणे, सहायक निरीक्षक सतिष शिरसाठ, उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पूर्वाश्रमीची नेहा बापू डावरे हिचा विवाह 4 जून 2025 रोजी झाला. अवघ्या पाच महिन्यांत तिने जीवन का संपवले, याचा संपूर्ण पट चिठ्ठीत मांडला आहे. नेहा म्हणते लग्नाची सुपारी फुटल्यापासून सासरच्या लोकांनी विविध पद्धतीने त्रास देण्यास सुरुवात केली. हुंडाप्रथा बंद असली तरी रिवाजाप्रमाणे सोने, चांदी तसेच भांडी मागण्यात आली. रेशीमबंध बँक्वेट हॉलमध्ये दोन हजार वर्‍हाडींच्या उपस्थितीत धूमधडाक्यात विवाह झाला. यासाठी 15 लाखांचा खर्च झाला होता. तरीही त्यानंतर नेहाला सासरी मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. एक नणंद दोन मुलांसह माहेरीच वास्तव्याला, दुसरी घराजवळच पाच मिनिटांच्या अंतरावर तर तिसरी जत्रा हॉटेल परिसरात राहते. तिन्ही नणंदांचं ऐकून पती व सासू टोमणे मारायचे. तू आल्यापासून गॅसची टाकी लवकर संपते. स्वयंपाक येत नाही, असे बोलणे ऐकवले जायचे. लग्नाआधी पतीचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे अश्लील फोटोही नवर्‍याने नेहाला दाखवले होते. तेव्हा तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. भावाकडून पैसे आण, गाडी आण, असा तगादा लावला जायचा. यादरम्यान नेहाच्या दोन आजी व एका भावाचे निधन झाल्यानंतर केवळ अंत्ययात्रा व दहाव्याला जाऊ दिले. भावाच्या अंत्ययात्रेत तर एका नणंदेने वैकुंठरथातही टोमणे मारायचे सोडले नाही. दिवाळीसाठीही अल्पवेळेसाठीच माहेरी पाठवण्यात आले. त्यावेळी लगेच सासरी येण्यासाठी तगादा लावण्यात आला. माहेरी आल्यानंतर काही जादूटोणा तर करून आणला नाही ना, हे पाहण्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत पर्स तपासण्यात आली. नवर्‍याची मारहाण, वाईट शिवीगाळ असा त्रास सुरूच होता. मासिक धर्माचा त्रास झाल्यानंतर खातरजमा करण्यासाठी सासूने सांगितल्याप्रमाणे नणंदेने तपासणी केली. लग्नानंतरही नवर्‍याने कौमार्याचा संशय घेतला होता. या सर्व त्रासामुळे रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा विष पिऊन झोपत आहे, असे सांगून नेहाने या जगाचा निरोप घेतला.

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago