विरोध करणार्या पतीलाही मारहाण; गुन्हा दाखल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड येथील गोरेवाडी परिसरात एका 23 वर्षीय तरुणाने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रिक्षातून उतरत असताना संशयिताने महिलेचा हात पकडून मोबाइल नंबरची मागणी केली. तसेच विरोध करणार्या महिलेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 29 जून रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास पतीसह मुलाला शाळेत सोडून रिक्षाने घरी परतत होत्या. गोरेवाडी परिसरातील नवीन पाण्याच्या टाकीजवळ रिक्षाचा वेग कमी झाला असता, त्याच परिसरात राहणारा परिचयातील संशयित जयेश केशव थोरात (वय 23, रा. गोरेवाडी, शास्त्रीनगर) हा रिक्षाजवळ आला. त्याने महिलेचा उजवा हात पकडून मोबाइल नंबरची मागणी केली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित गेल्या अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. तिच्या इच्छेविरुद्ध पाळत ठेवणे तसेच वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराला महिला व तिच्या पतीने विरोध केल्यानंतर संशयिताने आक्रमक भूमिका घेत महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार झाडे-जाधव करत आहेत.
Married woman molested at Nashik Road