ईद-उल-फित्रच्या चंद्र दर्शनाची आज शक्यता
सामुदायिक नमाजासाठी शहाजहानी ईदगाह सज्ज
जुने नाशिक : वार्ताहर
पवित्र रमजान महिन्यातील आज (दि.१) २९वा उपवास पुर्ण होणार असून सायंकाळी चंद्र दर्शनाची शक्यता आहे. दरम्यान आज चंद्रदर्शन घडल्यास किंवा इतर ठिकाणाहून साक्ष (शहादत) मिळाल्यास ईदचा सण उद्या (दि.२) साजरा होईल. अन्यथा मंगळवारी (दि.३) ईद साजरी होईल, अशी माहिती स्थानिक चाँद कमिटीतर्फे देण्यात आली आहे. दरम्यान ईदच्या सामुदायिक नमाजासाठी शहरातील ऐतिहासिक शहाजहानी ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले आहे.
दरम्यान आज सायंकाळी रोजा सोडल्यानंतर शहरातील मुस्लिम बांधवांनी शव्वाल महिन्याचे चंद्र दर्शन घेण्याचे नियोजन करावे, चंद्रदर्शन घडल्यास याची साक्ष स्थानिक चाँद कमिटीला द्यावी, असे आवाहन कमिटीतर्फे करण्यात आले आहे. मात्र कथडा येथील कागझीपुरा मशिदीचे मुख्य इमाम मौलाना सय्यद असिफ इकबाल यांनी आज चंद्र दर्शन घडणार नसल्याची माहिती त्यांच्या युट्यूब चॅनलद्वारे दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ईदचे चंद्र दर्शन
उद्या होणार आहे. यासाठी त्यांनी खगोल शास्त्रातील विविध गोष्टींचा पुरावा सादर केला आहे. तरीदेखील मुस्लिम बांधवांनी आज चंद्र दर्शन घेण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी चॅनेलद्वारे केले आहे. दरम्यान ईदच्या खरेदीसाठी काल दिवसभर व रात्री उशिरापर्यंत बाजारात महिलांची प्रचंड गर्दी उसळली होती. फुले मार्केट, दूध बाजार, भद्रकाली, दहीपुल आदी भागांमध्ये गर्दी झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. यामुळे वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी काही मुस्लीम युवकांनी हाती घेतल्याचे चित्र बघावयास मिळत होते.
ईदगाह मैदान सज्ज
ईदच्या सामुदायिक नमाजाचा मुख्य सोहळा गोल्फ क्लबवरील ऐतिहासिक शहाजहानी इदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे ईदगाह मैदानावर नमाजाचा सोहळा झाला नव्हता. यामुळे यावर्षी इदगाह इमारतीची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करावी लागली. तसेच संपूर्ण मैदानाचे सपाटीकरण केले गेले. तसेच मैदानाच्या प्रवेशद्वारांवर मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची मुबलक प्रमाणात सोय करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी दिली आहे.