नाशिक : नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेसाठी निवड झाली आहे. टी-20 चॅलेंज स्पर्धेचे सर्व सामने 23 ते 28 मे या कालावधीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे, पुणे येथील स्टेडियमवर होणार आहेत. महिला टी-20 चॅलेंज 2022 या स्पर्धेत दक्षिण अफ्रीका, इंग्लंड, वेस्ट इंडीज , ऑस्ट्रेलिया तसेच भारतातील दिग्गज महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे आयोजित लालभाई स्टेडीयम, सूरत येथे नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात नाशिकच्या माया सोनवणेने रेल्वे विरुद्ध 2 बळी घेतले . याआधी पुदुचेरी येथे झालेल्या साखळी सामन्यात देखील प्रभावी कामगिरी करताना माया सोनवणेने आंध्र व केरळ विरुद्ध 4/4 बळी घेतले होते. अशा प्रकारे आपल्या प्रभावी लेग स्पिन गोलंदाजीने मायाने या वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी स्पर्धेत एकूण 11 बळी घेत आपली छाप उमटविली. 2014-15 तसेच 2017-18 च्या हंगामात 23 वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक 15 गडी बात करण्याचा पराक्रम केला होता. पुदुचेरी येथे झालेल्या 23 वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत 2018-19 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयतर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी देखील निवड झाली . ह्या सगळ्या लक्षणीय, सातत्यपूर्ण कामगिरी च्या जोरावर मायाची महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेसाठी निवड झाली आहे.मुळची सिन्नरची असलेली माया सोनवणे , सिन्नरचे सुनील कानडी यांच्यामुळे क्रिकेट कडे वळली. अगदी सुरुवातीपासूनच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले . तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक शिवाजी जाधव, सिन्नर ह्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. वयाच्या केवळ 11 व्या वर्षीच मायाची महाराष्ट्र संघासाठी निवड झाली होती. दुखापतीमुळे दुर्दैवाने मायाचे दोन हंगाम वाया गेले. एक अतिशय भरवशाची अष्टपैलू खेळाडू होण्याचे तिचे स्वप्न आहे. योगायोगाने पूर्वी कधीही न बघितलेल्या द. आफ्रिकेच्या कंबरेत अतिशय वाकुन खास शैलीत गोलंदाजी करणार्या पॉल ऍडम्स प्रमाणेच माया उजव्या हाताने सुरेख लेग स्पिन टाकते. तसेच सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मोक्याच्या वेळी संघाला मदत करीत असते.