राजस्थान कनेक्शन उघड; नाशिक पोलिसांची कारवाई
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत गुरुवारी (दि. 18) रात्री एकाच वेळी दोन मोठ्या कारवाया करत ड्रग्जमाफियांचे कंबरडे मोडले. अमली पदार्थविरोधी पथक, गुंडाविरोधी पथक आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने नाशिकरोड भागात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 16 लाख 4 हजार 250 रुपयांचे एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी जोधपूर (राजस्थान) कनेक्शन उघड झाले आहे. पोलिसांनी तीन तस्करांना रंगेहाथ अटक केली, तर दोन जण फरार आहेत.
अमली पदार्थविरोधी पथकाचे अंमलदार गणेश वडजे यांना एका स्प्लेंडर मोटारसायकलवरून (एमएच 15-बीबी 6647) एमडी ड्रग्जची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथक आणि उपनगर पोलिसांनी संयुक्तपणे स्वानंद महिला सांस्कृतिक मंडळाच्या हॉलसमोर सापळा रचला. गुरुवारी (दि. 18) रात्री पावणेआठच्या सुमारास संशयित दुचाकीवरून आले असता, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून दोघांना ताब्यात घेतले. फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे दहा लाख दोन हजार 500 रुपयांचे एमडी ड्रग्ज सापडले. अटक केलेले आरोपींमध्ये श्रवणकुमार लाखाराम बिष्णोई (वय 29) आणि पुनाराम हिराराम बिष्णोई (वय 32, दोघे रा. जोधपूर, राजस्थान. सध्या रा. प्रेमसागर स्वीट्सजवळ, नाशिकरोड) यांचा समावेश आहे. श्रवणकुमारकडून सहा लाख सात हजार 500 रुपयांचे, तर पुनारामकडून तीन लाख 95 हजार रुपयांचे ड्रग्ज, विवो मोबाइल, वजनकाटा आणि 70 हजार 100 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
या पहिल्या कारवाईनंतर काही तासांतच उपनगर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांना सद्गुरूनगर भागातील एका रो-हाउसमध्ये ड्रग्जचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी रात्री 11.30 वाजता शिवम रो-हाउसच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकला. येथे पोलिसांनी संशयित सुरेश गोदारा याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली. हॉलमधील गादीच्या कोपर्यात ठेवलेल्या काळ्या बॅगेत सहा लाख एक हजार 750 रुपये किमतीचे 120.35 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 82 रिकाम्या झिपर प्लास्टिक पिशव्या व इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आढळला.
मोबाइल फॉरेन्सिक टीमच्या केमिकल अनालायझर श्रीमती पी. आर. पवार व सायंटिफिक असिस्टंट व्ही. जे. कौटकर यांनी जागेवरच चाचणी करून हे ड्रग्ज एमडी असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी सुरेश पुनवाराम गोदारा (वय 27, रा. शिवम रो-हाउस, नाशिकरोड) याला अटक करण्यात आली. पुनाराम इसरवाल (30, रा. राजस्थान) आणि श्रवण माचरा (रा. जोधपूर, राजस्थान) फरार आहेत.
या दोन्ही कारवायांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस हवालदार गजेंद्र बरेलीकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. राजस्थानमधील मोठ्या माफियांपर्यंत पोलीस पोहोचले असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? नाशिकमध्ये हे ड्रग्ज कुणाला पुरवले जाणार होते? याचा पुढील तपास अमली पदार्थविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व उपनगरचे उपनिरीक्षक सपकाळे करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, अमली पदार्थविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संदीप चौधरी, ताजणे, हवालदार बळवंत कोल्हे, मिलिंद बागूल, गौरव गवळी, योगेश सानप, बाळासाहेब नांद्रे, अर्चना भड, उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार ठाकरे, भागवत, गांगुर्डे, जाधव यांनी केली.
MD worth ₹16 lakh seized from drug mafia in Nashik.