Oplus_0
पाच दिवसांची कोठडी; सप्तशृंगगड पायथ्याशी विवाह, ..अन् नवरी पळाली
अभोणा : पद्मभूषण शहा
विवाहेच्छूक गरजू तरुणांना गाठून त्यांचे खोटे लग्न लावून देत लाखोंंचा गंडा घालणार्या वेरुळे (ता. कळवण, जि. नाशिक) येथील मायलेकाला अभोणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयात उभे केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या तोतया ‘शुभमंगल’ टोळीचे राज्यात मोठे रॅकेट असण्याचा संशय व्यक्त होत आहे. इतर गुन्हेगारांशी त्यांचा काही संबंध आहे का? त्यादृष्टीनेदेखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की, विवाहेच्छूक गरजू तरुणांना गाठून त्यांचे खोटे लग्न लावून लाखो रुपये उकळल्याची फिर्याद पोलिसांत दाखल झाली होती. त्यात संशयितांनी ओळखीचा फायदा घेत सागर संतोष तिरमली ( 27, रा. गोपालपूर, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, धुळे) या पानटपरीचा व्यवसाय करणार्या तरुणाकडून लग्नाआधी दोन लाख व लग्नानंतर दोन लाख 50 हजार रुपये असे एकूण चार लाख 50 हजार रुपये लुबाडून कार्तिकी आहिरे ( 25, इगतपुरी, नाशिक) या मुलीशी सप्तशृंगगड पायथ्याशी लग्न लावून दिले होते. लग्नानंतर दोंडाईचा येथे सासरी जाताना रस्त्यात जेवणासाठी थांबले होते. या संधीचा फायदा उठवत नवरीने नवरदेवाचा मोबाइल घेतला अन् बाथरूमला जाऊन येते, असे सांगून पसार झाली.
नवरदेवाच्या वाहनामागे एक चारचाकी व दोन दुचाकीस्वार पाठलाग करत होते. त्या वाहनांमध्ये बसून मुलगी पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला. पतीसह सासरच्या लोकांनी तिला सासरी नांदायला वारंवार बोलावले. पण घडले भलतेच, त्या नवरी मुलीस न पाठविता संबंधित संशयित महिला म्हणाली की, तुमचे आता दुसर्या मुलीशी लग्न लावून देते, पण त्यासाठी एक लाख 50 हजार रुपये द्यावे लागतील. आपण गंडवले गेल्याची जाणीव झाल्याने थेट अभोणा पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास केला, संशयितांना बेड्या ठोकल्या. सहआरोपी म्हणून चाळीसगावचा अनिल पाटील नामक व्यक्ती कैदेत आहे.
कळवण तालुका न्यायालयात उभे केले असता, या संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी यशोदा ऊर्फ केशरबाई किसन पवार (45) व जालीराम किसन पवार (27, दोन्ही रा. वेरुळे, ता. कळवण, जि. नाशिक) या मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक अंबादास गायकवाड तपास करीत आहेत.
वर्हाडींना थांबवले शेडमध्ये
सिन्नर-सामनगाव रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये वर्हाडींना
2 एप्रिलला मुक्कामी थांबविले होते. नंतर 3 एप्रिलला सकाळी कोर्टात जाऊन आधी लग्न करू, मग गडावर जाऊन पुन्हा लग्न लावू, असे सांगून नेले. मात्र, नाशिकला न थांबता गाडी सरळ सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी आणून थांबविली. येथे नवरदेव- नवरीच्या गळ्यात हार टाकून लग्न लावून दिले. त्यानंतर संशयित मायलेक वेरुळे गावी जाण्यासाठी माघारी फिरले. वर्हाडी नवरीला घेऊन दोंडाईचाला निघाले. या प्रकरणातील फिर्यादी नवरदेवाची आई कल्पना संतोष तिरमली यांनी चाळीसगावमध्ये राहणारी मावसबहीण मोतमबाई गुलाब तिरमली यांना मुलगी बघायला सांगितल्याने चाळीसगावातील अनिल पाटील नामक व्यक्तीने मध्यस्थी करून वेरुळेच्या यशोदा पवार या संशयित महिलेशी संपर्क साधून स्थळ दाखवून लग्न ठरविले होते.
आरोपीने पाठवले 11 मुलींचे फोटो
एक नवरी वाटेतूनच पळाल्याने संबंधित संशयित महिलेने दुसर्या 11 मुलींचे फोटो आम्हाला पाठवून यातील एक मुलगी पसंत करा, तिच्याशी लग्न लावून देते, पण त्यासाठी तिने दीड लाखाची मागणी केली होती. पोलिस ठाण्यात ही पाचवी फेरी आहे. सुरुवातीला तत्कालीन अधिकारी केस दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत होते. आपसात मिटवून घ्या, कोर्टात गेले तर तुमचे पैसे मिळणार नाही, असे सांगत होते. आमच्यासारख्या अनेकांना गंडा घालण्याची भीती होती. त्यामुळे आम्ही केस दाखल करण्यासाठी ठाम राहिलो, असे नवरदेवाचे दाजी ईश्वर भामरे (35, नाशिक) यांनी ‘दैनिक गांवकरी’शी बोलताना सांगितले.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…