नाशिक

दुर्लक्षामुळे मनमाड बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

प्रवाशांचे हाल; महिलांची कुचंबणा, शौचालयामध्ये गर्दुल्ल्यांचा वावर

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड शहर परिसरात तुरळक झालेल्या पावसामुळे मनमाड बसस्थानकात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मनमाड बसस्थानकाची दुरवस्था झाली असताना, आता त्याच ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्याने एसटी प्रशासनाचे स्थानकाकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
बसस्थानक प्रशासनातर्फे केवळ बसस्थानकाला नूतनीकरण सुरू असल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र, प्रवाशांना सुविधा देण्यास प्रशासन कमी पडत आहे. बसस्थानकावर महिलांसाठी बांधलेल्या सुलभ शौचालयामध्ये राजरोस गर्दुल्ले बसतात, महिलांची छेड काढतात. याबाबत अनेकदा तक्रारी देऊनही आगारप्रमुख याकडे दुर्लक्ष करत आहे. या परिसरात असलेले सीसीटीव्हीदेखील अनेक दिवसांपासून बंद आहेत.
पावसाळा सुरू होऊन पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही, मात्र अत्यल्प पावसामुळे मनमाड बसस्थानकात पाणी साचून काही प्रमाणात खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे एसटी बसेस बाहेर नेताना व स्थानकात आणताना वाहनचालकांना या खड्ड्यांमुळे खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो. मनमाड बसस्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना सध्यातरी या चिखलमय मार्गातूनच ये-जा करावी लागत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरल्याने शेकडो प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनमाड बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली आगारप्रमुख व बसस्थानक प्रशासन प्रवाशांना सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे, तसेच मनमाड शहर बसस्थानकातून शिर्डी, शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, नस्तनपूर, सप्तशृंगगड, रेणुकामाता यासह गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांत बस सुविधा चालतात. या बसस्थानकांतून शेकडो भाविक प्रवास करतात. मात्र, एसटी आपल्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मनमाड आगारप्रमुख तसेच मनमाड बसस्थानकातील प्रशासन विसरले की काय, असा सवाल प्रवाशांतर्फे उपस्थित केला जात आहे. मनमाड बसस्थानकात महिलांसाठी असलेल्या सुलभ शौचालयात गर्दुल्ले बसतात, महिला, विद्यार्थिनींची छेड काढतात, याबाबत अनेकदा तक्रारी देऊनदेखील प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. चोर्‍यांचे प्रमाणही वाढले आहे. बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असून, याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र, नूतनीकरणाच्या नावाखाली बसस्थानक अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.

मनमाड बसस्थानक अतिशय वर्दळीचे आहे. मनमाड शहरातून येवला, चांदवड, मालेगाव, लासलगाव, नांदगाव यांसह इतर ठिकाणी शाळा, महाविद्यालय तसेच सरकारी नोकरी व खासगी नोकरीनिमित्त तरुणी, महिलांची गर्दी असते. मात्र, रोज महिलांची छेडछाड होते. महिलांच्या अंगावर हात टाकला जातो. महिलांच्या पर्स, मोबाइल, दागिने चोरीला जातात. याबाबत अनेक तक्रारी देऊनदेखील कारवाई होत नसल्याने मनमाड बसस्थानके महिलांसाठी असुरक्षित बसस्थानक आहे.
– सविता गुंजाळ, महिला प्रवासी

Gavkari Admin

Recent Posts

त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड, पोलिसही झाले चकित

पोलिसांपासून बचाव करण्यासाठी   त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड तीन वर्षांपासून फरार पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला अटक…

15 hours ago

हिट अँड रन: शाळेत जाणाऱ्या मुलीचा डंपरच्या धडकेने मृत्यू

डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि…

17 hours ago

नाराजीनाट्याचा बुरखा

राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती…

19 hours ago

आयारामांना पायघड्या; निष्ठावानांना संतरज्या!

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक…

19 hours ago

अपेक्षांच्या बळी मुली

नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने…

19 hours ago

अश्व धावले रिंगणी

इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा इंदापूर : पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल…

20 hours ago