आपण ज्या महान पुरुषाचे स्मरण करतो, ते करताना काळाचे भान आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कामाची प्रस्तुतता यांचा मेळ घालायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रसिद्ध पाश्चिमात्य विचारवंत थॉमस कारलाईन म्हणतात, ’मानवतेच्या भल्यासाठी आपले उभे आयुष्य अर्पण करणारी मोठी माणसे नेहमी इतिहासाला दिशा व आकार देण्याचे काम करतात.’ त्यांपैकीच एक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होय.
एक निष्पृश्य न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होय. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात 18 जानेवारी 1842 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. पुढे ते मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. सन 1862 मध्ये बी.ए. आणि सन 1864 मध्ये एम.ए.च्या परीक्षेतही प्रथम वर्ग मिळवून दोन्ही पदव्या संपादन केल्या.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी काही दिवस अक्कलकोटच्या महाराजांचे कारभारी आणि कोल्हापूर संस्थानाचे दिवाण म्हणून काम पाहिले. 1862 मध्ये निघालेल्या ’इंदुप्रकाश’ या वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीतून त्यांनी समाजसुधारणेविषयी लेख लिहिले. त्या लेखांमध्ये त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले. सन 1865 मध्ये स्थापन केलेल्या ’विधवा विवाह उत्तेजक मंडळ’ न्यायमूर्ती एक प्रमुख सभासद असल्याने काही विधेयकाला त्यांनी पाठिंबा दिला. न्यायमूर्ती 1866 मध्ये कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. न्यायमूर्तीने 1867 मध्ये स्थापन झालेल्या ’प्रार्थना समाजाचे’ ते एक प्रमुख सभासद होते. न्यायमूर्तीने 1868 मध्ये मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इतिहास व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. असं म्हणतात, ’आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचे आपण देण लागतो’ या उक्तीप्रमाणे न्यायमूर्तींचे सामाजिक कार्य वेगाने चालू होते. सन 1870 मध्ये न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका या दोघांच्या पूर्णकाराने सार्वजनिक स्वरूपाची कामे करण्यासाठी ’सार्वजनिक सभा’ या संस्थेची स्थापना झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे कर्तृत्व महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर अनेक देशव्यापी चळवळींच्या मुळाशी त्यांची प्रेरणा होती. अनेक चळवळींमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. ’मराठेशाहीचा उदय व उत्कर्ष’ या विषयावर चिकित्सक अभ्यास करणारे न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सार्वजनिक कार्याला गती तर दिलीच, पण एका उच्च स्तरावर राहून या चळवळींना पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला. या चळवळींचा रथ पुढे नेताना त्यांनी समाजाला आधुनिक जगाची ओळख करून दिली. विधवा विवाहाचा पुरस्कार करून एक नवं वळण रुजवण्याचा प्रयत्न केला. बालविवाह आणि जातीयता या सामाजिक विघातक रूढीविरुद्ध जागृती निर्माण करण्याचे कार्य केले. सन 1871 मध्ये न्यायमूर्तींची जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1874 मध्ये त्यांनी सार्वजनिक सभेच्या वतीने जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज इंग्लंडला पाठविला. नंतरच्या काळात 1885 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक म्हणूनही न्यायमूर्ती रानडे यांचा उल्लेख केला जातो. न्यायमूर्ती सतत सामाजिक प्रश्नांंना प्राधान्य देऊन समाज सुधारण्याचा मार्ग भारतीय सामाजिक परिषदेतून करत होते. न्यायमूर्ती रानडे यांनी काँग्रेसने राजकीय प्रश्नाबरोबरच सामाजिक प्रश्नातही लक्ष घालावे, असे परखड विचार मांडले होते.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे उत्तम लेखक होते. त्यांचे ’राइज ऑफ मराठा पॉवर’ हे इंग्रजी पुस्तक विशेष गाजले. तसेच त्यांची ’मराठी सत्तेचा उदय’ ही ग्रंथसंपदा विशेष लोकप्रिय ठरली.
न्यायमूर्ती रानडे उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते. भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 1890 मध्ये त्यांनी ’औद्योगिक परिषदेचा’ उपक्रम सुरू करून हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जसे निष्पृश न्यायाधीश म्हणून मान्यता पावलेले होते तसेच ते उत्तम अर्थतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते. सन 1893 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. पुणेकरांनी केलेल्या त्यांच्या एका सत्काराप्रसंगी सरन्यायाधीश मायकेल वे स्टॉप म्हणाले, की महादेव रानडे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले यात त्यांचा गौरव नसून त्यांच्यासारख्या ज्ञानी व निष्पक्षपाती न्यायाधीश मिळाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयच गौरवाला पात्र झाले आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे उत्तम साहित्यिक असल्याने त्यांनी ’मराठी ’ग्रंथोत्योेेजक मंडळ’ नावाची एक संस्था स्थापन केली.
न्यायमूर्ती रानडे यांची विशेषता म्हणजे नामदार गोखले हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे गुरू, तर नामदार गोखले यांचे गुरू न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी न्या. रानडे यांचे वर्णन ’हिमालयाप्रमाणे भव्य आणि उत्तुंग’ असे केले आहे. अशा या नाशिक जिल्ह्याच्या विद्वान महापुरुषाने जीवनाच्या रंगमंचावर न्यायाधीश, समाजसुधारक, लेखक, अभ्यासक, प्रमुख वक्ते, अर्थशास्त्रज्ञ अशा नानाविध भूमिका बजावून इतिहासाच्या सोनेरी पुस्तकात आपली नोंद केली आहे. अशा या निष्पृश्य न्यायाधीशाचे निधन 16 जानेवारी 1901 रोजी झाले. आज त्यांचा स्मृतिदिन!
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…