शालिमारला अतिक्रमित दुकानांवर मनपाची कारवाई

नेपाळी कॉर्नर येथील दुभाजकावर जेसीबी; रस्ता झाला मोकळा

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालिमार परिसरात मनपाच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी (दि.12) रस्त्यावर हातगाडे लावून थेट रस्त्याची कोंडी करणार्‍या विक्रेत्यांच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. विशेषत: नेपाळी कॉर्नर येथील दुभाजक थेट जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा परिसर मोकळा करण्यात आला. दरम्यान, दुभाजक हटवताच परिसराने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले.
आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने ही मोहीम राबविण्यात आली. या अतिक्रमणाविषयी नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. उपायुक्त (अतिक्रमण) संगीता नांदूरकर, शहर अभियंता संजय अग्रवाल आणि विभागीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अतिक्रमण पथकाने कारवाई केली. विभागीय अधिकारी चंदन घुगे, विनायक जाधव, प्रवीण बागूल, सुनील कदम, जय काळे, जावेद शेख, सचिन जाधव, संजय सूर्यवंशी, बापू लांडगे व विशाल प्रमाणे हे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शालिमार परिसरात रस्त्यावरील दुभाजकाच्या मदतीने विक्रेत्यांनी अनधिकृतपणे दुकाने थाटली होती. मात्र, महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करत ती गुरुवारी हटविण्यात आली. स्थानिक रहिवाशांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दुभाजकाच्या बाजूने तसेच रस्त्याच्या कडेला परवानगीशिवाय व्यापार्‍यांनी स्टॉल व दुकाने उभारल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. पादचारी आणि वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिकांच्या सूचनेनुसार प्रशासनाने कारवाई करत अतिक्रमण हटवले. सार्वजनिक रस्ते, डीवायडर व पदपथांवर अतिक्रमण करणार्‍यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, परिसर मोकळा झाल्याने दिलासा मिळाल्याची भावना वाहनधारक व नागरिकांनी व्यक्त केली.

Municipal Corporation takes action against encroached shops in Shalimar

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *