सहाशे वाड्यांवर मनपा करणार कारवाई

भिवंडी दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अतिधोकादायक वाड्यांवर कारवाई करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने केल्या आहेत. मुख्यमंत्री स्तरावरून शहरातील धोकादायक इमारतींवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यानंतर अतिक्रमण विभागाने पंधरा वाडे खाली करून
कार्यवाही केली.
नाशिक महानगरपालिकेने शहरातील अतिधोकादायक वाडे आणि जुन्या घरांविरोधात व्यापक कारवाई सुरू केली आहे. मुख्यमंत्री स्तरावरून धोकादायक इमारतींबाबत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर महापालिकेने शहरातील अतिधोकादायक बांधकामांची स्वतंत्र यादी तयार करत कारवाईला वेग दिला आहे. भिवंडी दुर्घटनेनंतर महापालिकेने पुन्हा सर्वेक्षण करून सुमारे 600 अतिधोकादायक वाडे व घरांची स्वतंत्र यादी तयार केली असून, संबंधित मालकांना तातडीने इमारती रिकाम्या करून स्वतःहून पाडण्याच्या नव्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी या इमारतींमध्ये कोणालाही वास्तव्य करू न देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आतापर्यंत शहरातील 15 अतिधोकादायक वाडे व घरे रिकामी केली आहेत. वाडे मालकांनी जागा खाली केली नाही तर त्या ठिकाणी महापालिकेकडून यंत्रणांच्या सहाय्याने वाडे पाडले जात आहेत. या कारवाईसाठी होणारा संपूर्ण खर्च संबंधित मालमत्ता मालकांकडून वसूल केला जाणार आहे. गुरुवारी पंचवटी परिसरातील काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा, सरदार चौक परिसरात सात धोकादायक वाडे पाडण्यात आले. तसेच विकासकामांना अडथळा ठरणारी अतिक्रमणेही हटविण्यात आली. कारवाईदरम्यान अतिक्रमण विभाग, नगररचना विभाग, पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारी मोठ्या बंदोबस्तात उपस्थित होते.

धोकादायक इमारतींबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणार्‍या वाड्यांवर नियमानुसार कारवाई सुरू आहे. संबंधित मालकांनी नोटिशींचे पालन करून इमारती
स्वतःहून रिकाम्या कराव्यात, अन्यथा महापालिका कारवाई करून खर्चही संबंधितांकडून वसूल करेल. – सुवर्णा दखणे, उपायुक्त, अतिक्रमण

 

Municipal Corporation to take action against 600 wadas.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *