इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील वैतरणा डॅम जवळील राजाराम खातळे यांच्या शेताजवळ एका अनोळखी इसमाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाच्या गळ्यावर तीष्ण हत्याराने वार करून ठार मारल्याचे दिसून येत आहे. याबाबत धारगांव येथील पोलीस पाटील लक्ष्मण बाबुराव खातळे यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दि. 26 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वैतरणा डॅम जवळ एका अनोळखी व्यक्तिला अज्ञात मारेकराने गळ्यावर तीष्ण हत्याराने जीवे ठार मारले. या नंतर अज्ञात मारेकर्याने मृतदेह कुणाला दिसु नये म्हणुन पुरावा नष्ट करण्यासाठी वैतरणा डॅमकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला राजाराम खातळे यांच्या शेताच्या कोपर्यात नेऊन मृतदेहाच्या अंगावर प्लास्टीकच्या गोण्या टाकुन पुरावा नष्ट करण्यासाठी जाळुन टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून अज्ञात मारेकर्या विरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा भादवि कलम 302 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला असून, कोणाला या इसमाबाबत काही माहिती असल्यास घोटी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा,असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले आहे.