– अफजल पठाण
शब्द टाकले मी सहज,
कुणाला टोचण्यासाठी नव्हते,
पण काहींच्या मनाला लागले,
जणू ते त्यांच्यासाठीच होते!
गंमत अशी की,
माझ्या मनात कुणी नव्हतं,
पण स्टेट्स पाहून अनेकांच्या
मनात वादळ उठलं होतं!
आजच्या सोशल मीडियाच्या जगात स्टेट्स ठेवणं ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. एखादी आवडलेली शायरी, मनात आलेला विचार, आयुष्यातला अनुभव किंवा सहज सुचलेले चार शब्द आपण स्टेट्स म्हणून ठेवतो. स्टेट्स टाकणारा काही वेळात ते विसरूनही जातो, पण ते वाचणार्यांच्या मनात मात्र विचारांचं महाभारत सुरू झालेलं असतं! ज्याचा त्या स्टेट्सशी काडीमात्र संबंध नसतो, तोही त्यात स्वतःचा शोध घेऊ लागतो. विश्वासघातावर शायरी टाकली की कुणाला वाटतं, आपल्याला टोमणा मारला आहे. मैत्रीवर लिहिलं की, एखादा मित्र दुखावतो. नात्यांवर विचार मांडला की, कुणाच्या मनात संशयाची घंटा वाजते. आणि ज्याच्यासाठी ते स्टेटस नसतंच, तोच मनातल्या मनात म्हणतो, हे माझ्यासाठीच टाकलंय! मग सुरू होतो अंदाजांचा खेळ. पहिला विचार करतो, दुसरा मनावर घेतो, तिसर्याला राग येतो आणि चौथ्याच्या मनात तर संशयाचं संपूर्ण साम्राज्य उभं राहतं! काहींची अवस्था अशी होते की, समोरच्याच्या मनात काय चाललंय, हेही ते स्वतःच ठरवून टाकतात. जणू काही ते सायकीकच आहेत! स्टेट्सचा अर्थ स्वतःच लावायचा, स्वतःच निष्कर्ष काढायचा आणि स्वतःच राग धरायचा. वर एखाद्या तिसर्या व्यक्तीला स्क्रीनशॉट पाठवून चर्चेचा बाजारही भरवायचा!
काही लोक स्टेट्स वाचत नाहीत, तर त्याचा तपास करतात. अर्थ समजून घेत नाहीत, तर स्वतःच अर्थ लावतात. समोरच्याने काही सांगितलेलं नसतं, तरी त्याच्या शब्दांमागे छुपे संदेश शोधले जातात. ज्याचा संबंधच नसतो, तोही स्वतःला केंद्रस्थानी समजतो. खरंच, स्वतःला प्रत्येक गोष्टीचा संदर्भ समजण्याइतकं मोठं गैरसमजाचं दुसरं उदाहरण कोणतं?
अर्थात, काही स्टेट्स मुद्दाम एखाद्याला उद्देशून टाकले जातात, हेही खरं आहे. पण म्हणून प्रत्येक शायरी टोमणा आणि प्रत्येक विचार हा कुणावरचा आरोप असतो, असं नाही. कधी एखादी ओळ आवडते म्हणून शेअर केली जाते, कधी ती स्वतःच्या अनुभवाशी जुळते, तर कधी तिचा कुणाशीही संबंध नसतो. पण संशयी मनाला साध्या शब्दांतही टोमणे दिसतात आणि सामान्य विचारांतही स्वतःविरुद्धचा संदेश जाणवतो.
खरी गंमत इथेच आहे स्टेट्स टाकणारा आपल्या कामात व्यस्त असतो आणि ते वाचणारा मात्र दिवसभर त्याचा अर्थ शोधत बसतो. माझ्यासाठीच असेल का? माझ्याबद्दल कुणी काही सांगितलं असेल का? असे प्रश्न स्वतःच निर्माण करतो. जिथे काहीच नसतं, तिथे कल्पनेने गोष्टी तयार होतात आणि मग विनाकारण राग, गैरसमज आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण होतं.
आज संवादापेक्षा अंदाजांना आणि विश्वासापेक्षा संशयाला अधिक महत्त्व दिलं जातं. मनात प्रश्न असेल तर थेट विचारण्याऐवजी निष्कर्ष काढले जातात. चार ओळींच्या स्टेट्समुळे बोलणं बंद होतं, नाती दुरावतात आणि कधी कधी वर्षानुवर्षांची ओळखही कटुतेत बदलते. विचार करा, एखाद्या स्टेट्सचा अर्थ विचारून समजून घेणं इतकं अवघड आहे का? की गैरसमज करून घेण्यातच काहींना वेगळा आनंद मिळतो?
लक्षात ठेवा, प्रत्येक स्टेट्स तुमच्यासाठी नसतं, प्रत्येक शायरी टोमणा नसते आणि प्रत्येक शांतता रागाची खूण नसते. दुसर्याच्या मनात काय आहे, हे चार ओळी वाचून समजत नाही. त्यासाठी संवाद, विश्वास आणि समजूतदारपणा लागतो. प्रत्येक गोष्ट स्वतःशी जोडणं म्हणजे समोरच्याला समजून घेणं नव्हे, तर
स्वतःच्याच संशयाच्या जाळ्यात अडकणं आहे.
स्टेट्स आवडलं तर दाद द्या, नाही आवडलं तर पुढे जा. पण प्रत्येक शब्दाचा पंचनामा करून स्वतःची मनःशांती गमावू नका. कारण स्टेट्स काही तासांत नाहीसं होईल, पण त्यातून निर्माण झालेला गैरसमज वर्षानुवर्षं नात्यांमध्ये जिवंत राहू शकतो.
स्टेट्स माझं होतं,
अर्थ तुमचा निघाला
मनात कुणी नव्हतं,
तरी राग तुमचा वाढला!
शब्द चार होते,
तुम्ही कथा हजार केल्या
आणि नसलेल्या गोष्टीवर
नाती दुरावून घेतल्या!
My status, your misunderstandings!
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…
सिडको : प्रतिनिधी पाथर्डी रोड परिसरातील एका इमारतीत राहणार्या अंजली प्रवीण घुगे (वय 31) यांनी…