नाशिक : प्रतिनिधी
पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी नमामि गोदा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता . नमामि गोदा प्रकल्प हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात आहे . महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मनपातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती गठीत केली असून , समिती आलेल्या एकूण ७ प्रस्तावांची सध्या छाननी करीत आहे . त्यामुळे प्रशासन सध्या नमामि गोदा प्रकल्पासाठी सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे .
नमामि गोदा प्रकल्पाच्या सल्लागार होण्यासाठी सध्या नाशिक महापालिकेकडे एकूण सात कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत . एका कंपनीचा प्रस्ताव सुमारे पाचशे पानांचा असून , एकूण सुमारे साडेतीन हजार पानांचे प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत . आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन प्रयत्नशील असल्यामुळे आलेल्या प्रस्तावांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे . कंपनीने यापूर्वी कुठे काम केले आहे व कोणत्या दर्जाचे काम केले आहे , यापासून आपले काम कसे पद्धतीने करणार यापर्यंत सर्व बाजू तपासण्यात येत आहे . यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी शहर अभियंता शिवकुमार बंजारी यांच्यासह एकूण ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठीत केली असून , ही समिती सध्या नमामिसाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी करीत आहे . सुमारे एक महिन्याचा कालावधी या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणार असून , यानंतर आर्थिक बीड ओपन करून सल्लागाराची नेमणूक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे . महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय जलमंत्री गजेंद्र सिंग शेखावत आदींना साकडे घातले होते . गजेंद्र सिंह शेखावत यांनी माजी महापौर कुलकर्णी यांच्या मागणीला साथ देत महापालिका प्रशासनाने याबाबत डीपीआर सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या . मात्र प्रशासनाच्या संथ कारभारामुळे याबाबतचा डीपीर वेळेत सादर होऊ शकला नाही . तरीही प्रशासक राजवट लागण्याच्या एक दिवस अगोदर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आडगाव या भागात लॉजिस्टिक पार्क तसेच बहुचर्चित नमामि गोदा प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करून नाशिककरांना हे गिफ्ट दिल्याचे सांगितले होते . दरम्यान सध्या महापालिकामध्ये प्रशासक राजवट सुरू आहे तर आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामि गोदा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागली आहे . प्रकल्पाच्या संपूर्ण नियोजनासाठी महापालिका सल्लागार नेमणूक करणार आहे . यासाठी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . पहिल्या वेळी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर ७ इच्छुकांनी यासाठी आवेदन सादर केले होते . त्यांची छाननी झाल्यानंतर सातपैकी सहा कंपन्या अपात्र ठरविण्यात आल्या होत्या . तर एकच कंपनी पात्र ठरविण्यात आली होती . मात्र , स्पर्धा करण्यासाठी कमीत कमी तीन कंपन्यांचे प्रस्ताव महापालिकेला हवे असल्यामुळे पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन १३ एप्रिलपर्यंत आवेदन घेण्यात आले . या काळात महापालिकेला पुन्हा एकूण सात प्रस्ताव प्राप्त झाले आहे .