मनमाड ः विशेष प्रतिनिधी
नांदगाव ते चांदवड रस्त्याच्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, अनेक ठिकाणी पुलाचे अर्धवट काम झालेले आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढली असून, रोज होणार्या अपघातांत अनेकांना अपंगत्व येत असून, आर्थिक भुर्दंड बसत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे सर्व काम पूर्ण करावे; अन्यथा भविष्यात पाऊस जास्त प्रमाणात झाला तर मनमाड-नांदगाव हा महामार्ग पूर्णपणे बंद होऊ शकतो व नांदगाव शहराशी संपर्क तुटू शकतो. यामुळे या महामार्गावर सुरू असलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरू
लागली आहे.
चांदवड ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग क्रॉंक्रिटीकरण करून चौपदरी करण्याचे काम सुरू आहे. बहुतांश भाग हा तयार झाला असून, नांदगाव ते मनमाड या भागाचे काम मात्र अत्यंत संथगतीने सुरू आहे. या 24 किलोमीटर अंतरात जवळपास छोटे-मोठे 17 पूल आहेत. या सर्व पुलांचे काम अर्धवट स्वरूपात असून, चांदवड ते मनमाड हा रस्ता पूर्ण झाला असला तरी 3 पूल हे अर्धवटच राहिलेले आहेत. या अर्धवट राहिलेल्या पुलाच्या कामामुळे वाहनचालकाला या जागेचा अंदाज येत नाही. परिणामी, रोज छोट्या-मोठ्या स्वरूपात अपघात होत आहेत.
अनेकांचे या अपघातात प्राण गेले तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले.
मात्र तरीही या रस्त्याच्या काम करणार्या ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसून, अत्यंत संथगतीने काम
सुरू आहे. संबंधित अधिकारी किंवा विभागाने याकडे लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच विलंब करणार्या या ठेकेदाराला शासनाच्या नियमानुसार आर्थिक दंड आकारावा, अशी मागणी जोर धरू
लागली आहे.