संपादकीय

गोदा गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याला हवा नाशिककरांचा उत्साही सहभाग

नाशिक ही धार्मिक, सांस्कृतिक नगरी असल्याने येथे बारा मास अनेक सण – उत्सव जल्लोषात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे अनेक साहित्यिक कार्यक्रमदेखील येथे होत असतात. मात्र, अलीकडच्या काळात सांस्कृतिक तथा साहित्य कार्यक्रमांमध्ये नाशिककरांचा म्हणावा असा सहभाग दिसून येत नाही. नाशिककरांचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावाने साहित्यिक क्षेत्रात नव्हे तर अनेक क्षेत्रांतही नाशिकनगरी ओळखली जाते. कुसुमाग्रज स्मारक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे गोदा गौरव
पुरस्कार होय.
कला, साहित्य, चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य, समाजसेवा, ज्ञान-विज्ञान अशा विविध क्षेत्रांत देशपातळीवर संस्मरणीय कामगिरी करणार्‍यांना कृतज्ञता म्हणून सन्मानित करणे हा पुरस्कारामागील उद्देश असून, हा पुरस्कार उत्तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा नागरी सन्मान मानला जातो. गोदावरी गौरव पुरस्कारामध्ये 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह प्रदान केले जाते. काही वर्षांपूर्वी या सांस्कृतिक सोहळ्याला नाशिककरांची अपार गर्दी होत असे. मात्र, अलीकडे हा सोहळा केवळ औपचारिकता बनला आहे, असे दिसून येते. वास्तविक पाहता या कार्यक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घ्यायला हवा, मात्र तसे घडून येत नाही, ही खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गोदा गौरव पुरस्कार पुरस्कार वितरण सोहळा झाला. मात्र, महाकवी कालिदास कलामंदिरऐवजी अन्य सभागृहात हा सोहळा घेण्यात येत असताना अनेक रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डहाके यांनी सांगितले की, कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुरस्कार दिलेली माणसे पाहिली की काहीतरी चांगले घडते आहे, असा विश्वास निर्माण होतो. देश सध्या वेगळ्या अवस्थेतून जात आहे. देशाचे वातावरण विज्ञानविरोधी होत असताना चांगले काम करणारी माणसे मिळणे अवघड झाले आहे. या सोहळ्यात सयाजी शिंदे (लोकसेवा), डॉ. अनिरुद्ध पंडित (विज्ञान), चंद्रमोहन कुलकर्णी (चित्र), उस्मान खान (संगीत), प्रशांत दामले (नाट्य), आशिष माने (साहस) यांना गौरविण्यात आले. एकवीस हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
ज्येष्ठ नागरिकांचे राज्यस्तरीय अधिवेशन :
भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाशिकमध्ये आयोजित राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक अधिवेशनाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, डी. एन. चापके, नाशिक प्रादेशिक अध्यक्ष अशोक होळकर यांच्यासह विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. वृद्धाश्रमांना भेट दिल्यानंतर तेथील परिस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद करत समाजाने ज्येष्ठांचा सन्मान राखावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्टतर्फे नवदुर्गा पुरस्कार महिला सन्मान सोहळा :
नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नवदुर्गा पुरस्कार, तसेच कर्तबगार महिला सन्मान सोहळा-2026 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इतर क्षेत्रांतही आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवणार्‍या महिलांना आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्या हस्ते कर्तबगार महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, विश्वस्त किशोर कोठावळे, आबा पवार, संतोष कोठावळे आणि विशाल पवार आदी उपस्थित होते. श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या या नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
अ. भा. शास्त्रार्थ महासभा, युवा विद्वत संमेलन :
केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय व महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान आयोजित अखिल भारतीय शास्त्रार्थ महासभा व युवा विद्वत संमेलन आयोजित करण्यात आले होते. या समारंभात अध्यक्षस्थानी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नाशिक परिसराचे संचालक आचार्य नीलाभ तिवारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कैलास मठाचे महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते झाले. यावेळी महामहोपाध्याय देवदत्त पाटील, नाशिक शृंगेरी मठाचे पदाधिकारी राम गोपाल अय्यर, उद्योजक धनंजय बेळे, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नगरसेवक गुरुमित बग्गा, नीलम पाटील, लक्ष्मण बोडके आदी उपस्थित होते.
गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे आचार्य रवींद्र पैठणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उद्घाटक संविदानंद सरस्वती म्हणाले की, संस्कृत भाषा हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे संस्कृत सर्व भाषांची जननी आहे. त्यामुळे तिचे जतन संवर्धन होणे गरजेचे आहे. या संमेलनात व्याकरणशास्त्र, ज्ञानशास्त्र मीमांसा, ज्योतिषशास्त्र वेदांत, धर्मशास्त्र श्रुती आदी शास्त्रांवर व संस्कृत ग्रंथांवर देशभरातून आलेल्या पन्नासपेक्षा अधिक विद्वानांकडून शास्त्रार्थ झाले आहे. नाशिकमध्ये पुढील वर्षी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व, संस्थांमधील पूजाविधी, अन्य धार्मिक विधी याबाबत संमेलनात चर्चा झाली.
‘श्रवणालय’ उपक्रमास प्रारंभ :
टीव्ही, मोबाइलमुळे माणसांमधील संवाद हरवत चालला आहे. गप्पांचा काना हरवून माणसं गप्प होत आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीत संस्कारक्षम पिढी घडविण्याची, विद्यार्थ्यांचे आयुष्य उभी करण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडावी. विद्यार्थ्यांनीही आपलं नाव मोठं करण्यासाठी नाही तर देशाचे नाव जगात मोठे करण्याचे ध्येय ठेवून अभ्यास करावा, असे आवाहन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. संदीपान जगदाळे यांनी केले. ‘कोवळे किरण’, श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक समाज आणि नाशिक महापालिका यांच्या वतीने ‘श्रवणालय… दलिसनिंग स्पॉट’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले.
श्री काळाराम मंदिरात सामुदायिक अग्निहोत्र :
जगद्गुरू भगवान दत्तात्रेय यांच्या गुरुपरंपरेतील आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपीठाचे उत्तराधिकारी, सत्यधर्म प्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराज, शिवपुरी (अक्कलकोट) यांच्या आशीर्वादाने 12 मार्च ‘विश्व अग्निहोत्र दिवस’निमित्त नाशिक येथे सामुदायिक अग्निहोत्र कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात अग्निहोत्र विधीचे महत्त्व, पर्यावरण शुद्धीकरण आणि मानवी जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी प्रत्यक्ष अग्निहोत्र करून त्याचा आध्यात्मिक अनुभव घेतला. याप्रसंगी श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त शांताराम अवसरे, शुभम मंत्री अ‍ॅड. अक्षय कलंत्री आणि प्रतीक पुजारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थानिक अग्निहोत्र, साधकांनी परिश्रम घेतले असून, नाशिककरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पल्लवी जोशी, नीलेश जोशी आणि गौरव दीक्षित यांनी विशेष सहकार्य केले.
महिला दिनानिमित्त 1500 महिलांची दुचाकी रॅली :
जागतिक महिला दिनानिमित्त वॉव (वूमन ऑफ विस्डम) संस्था आणि कम्युनिटी हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या महिला दुचाकी रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शहरातील 1500 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. रॅलीतील विविध स्पर्धांमध्ये आशा स्वार, आरती न्याहारकर, स्मिता पिंपरकर, प्रतिभा पाठक, सविता बाविस्कर, यशश्री बाविस्कर, माधुरी तांदळे, सोनल मांडगे, फाल्गुनी वडेरा, शीतल गुजराती, प्रज्ञा थोरात शशी दुबे यांसह विविध गटांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, वॉव अ‍ॅम्बॅसेडर गीता पाटील, डॉ. सृष्टी व्हीजन, योगा ट्रेनर राजेश्वरी नायडू, नीता राणे, नलिनी कड, फजलत सुरानी, रितू नथानी, टीया वर्मा आणि संस्कृती थोरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी अश्विनी न्याहारकर, विभा खोत, उज्ज्वला बोधले, मनीषा आहेर, माधुरी कोतवाल, शुभांगी कोठुळे, शुभांगी गोसावी, करुणा बागडे, नीलिमा चुंभळे, तन्वी बोडके यांच्यासह 400 हून अधिक सभासद महिलांनी परिश्रम घेतले.

Nashik residents’ enthusiastic participation is needed for the Goda Gaurav Award ceremony

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago