3500 नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप
♦ आठ हजारांहून अधिक नागरिकांनी केली रोपांसाठी नोंदणी
♦ पाचव्या टप्प्याअखेर 33 हजारपेक्षा अधिक वृक्षलागवडीस सुरुवात
नाशिक : प्रतिनिधी
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहराला हरित व समृद्ध बनवण्यासाठी नाशिककर सरसावले आहेत. मिशन ग्रीन मान्सून मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेच्या 5 व्या टप्प्यामध्ये म्हणजेच पाचव्या रविवारी नाशिककरांनी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून मागवलेल्या 8,750 देशी रोपांचे थेट प्रभागनिहाय वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. त्यापैकी आज 3500 नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना टप्प्याटप्प्याने प्रभागनिहाय वाटप करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी विशेष क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आजअखेर 8,750 वृक्षांची मागणी नोंदवण्यात आली आहे. या मागणीनुसार काल पाचव्या टप्प्यात प्रभागातील नगरसेवक, कार्यकर्ते, भूप्रहरी आणि नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाच्या माध्यमातून नागरिकांना ही देशी रोपे पुरवण्यास सुरुवात करण्यात आली.
मिशन ग्रीन मान्सूनच्या आतापर्यंत पार पडलेल्या चार टप्प्यांत 33 हजारांहून अधिक झाडे लागवडीस सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा : सातपूर देवराई आणि शिंदे ग्रामपंचायत हद्दीत एकूण 5,000 वृक्षारोपणाने मोहिमेचा शुभारंभ. दुसरा टप्पा : म्हसरूळ वनराई (पिकॉक हिल) व त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात 6,000 वृक्षांची लागवड. तिसरा टप्पा : ऐतिहासिक नंदिनी नदीच्या दुतर्फा 6,000 देशी वृक्षांचे हरित संरक्षण कवच. चौथा टप्पा : दर्याई माता परिसर (दरी) येथे 5,000 आणि पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र परिसरात 2,000 झाडे लागवडीस प्रारंभ.
आजच्या पाचव्या टप्प्याअखेर 8500 झाडांपेक्षा अधिक वृक्षांचे घरपोच वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.
या वाटपादरम्यान ओएसडी संदीप जाधव यांच्या फोनद्वारे ना. गिरीश महाजनांनी नागरिकांशी संवाद साधला आणि नाशिक शहराला निसर्गरम्य बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या प्रभागात मिळालेल्या झाडांचे योग्य ठिकाणी लागवड करून संवर्धन करण्याबाबत आवाहन केले.
वृक्ष वाटपाच्या या कार्यक्रमात महापौर हिमगौरी आहेर-आडके, नगरसेवक सुधाकर बडगुजर, योगिता हिरे, राहुल गणोरे, श्वेता भंडारी, सीमा पवार, राजेश पंडित, मनोज साठे, चंदू पाटील व मनपा उद्यान विभागातील विवेक भदाणे, प्रशांत परब, सचिन देवरे, श्रीकांत इर्नक, आशुतोष वरपे व तसेच प्रभागातील कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Nashik residents gear up for the ‘Mission Green Monsoon’ initiative!