– वाहिद बागवान
श्रद्धा आणि विकासाला जोडणारी नवी ‘एक्स्प्रेस’
महाराष्ट्र ही संतांची आणि तीर्थक्षेत्रांची भूमी आहे. एकीकडे कुंभमेळ्याची आणि गोदाकाठची पवित्र नगरी ’नाशिक’, तर दुसरीकडे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली साईबाबांची ’शिर्डी’. या दोन ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या शहरांना जोडणारा बहुचर्चित ’नाशिकरोड-साईनगर शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग’ हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाही, तर तो उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा एक नवा अध्याय ठरणार आहे. नुकतीच या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली असून, भविष्यातील विकासाचे वेध घेणारा हा प्रकल्प दृष्टिक्षेपात आला आहे. सध्या नाशिक ते शिर्डी या दरम्यानचा प्रवास पूर्णपणे रस्तेमार्गावर अवलंबून आहे. सण-उत्सव, गुरुवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी सिन्नर-शिर्डी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. सध्या खाजगी वाहनाने किंवा बसने शिर्डीला पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. प्रवासाचा ताण, वाढते अपघात आणि ट्रॅफिकची समस्या यामुळे भाविक आणि प्रवासी त्रस्त असतात.
प्रस्तावित दुहेरी रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यावर हाच प्रवास अवघ्या एक ते सव्वा तासावर येईल. हा दुहेरी मार्ग असल्यामुळे क्रॉसिंगसाठी गाड्यांना कुठेही ताटकळत उभे राहावे लागणार नाही. शिवाय, खासगी ट्रॅव्हल्स किंवा टॅक्सीसाठी प्रवाशांना एका बाजूच्या प्रवासासाठी जे तीनशे ते पाचशे रुपये मोजावे लागतात, त्या तुलनेत रेल्वेचा प्रवास अत्यंत माफक आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असेल. यामुळे प्रवाशांच्या वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.
हा नवीन रेल्वेमार्ग नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून सुरू होऊन सिन्नरमार्गे थेट साईनगर-शिर्डीला जोडला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नाशिक तालुक्यातील जाखोरी, देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, चेहेडी बुद्रुक, संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक, चाढेेगाव व सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी, कुंदेवाडी माजरे, वडजिरे, दातली, पाथरे खुर्द, दुशंंगवाडी, खोपडी खुर्द, पांगरी खुर्द, पांगरी बुद्रुक, मलढोण, खंबाळे, सिन्नर, फुलेनगर, ब्राह्मणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगाव, वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, भोकरी आणि सुंदरपूर अशा एकूण चौतीस गावांमधील जमिनींचे संपादन केले जाणार आहे.
भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सक्षम प्राधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सिन्नर तालुक्यासाठी निफाडचे उपविभागीय अधिकारी, तर नाशिक तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन-1) यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. जमिनीचा मोबदला हा ’रेडीरेकनर’ दरावर आधारित असेल आणि कायद्यानुसार अतिरिक्त लाभ दिला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विकासाच्या आड शेतकरी कधीच येत नाहीत. मात्र, त्याला विश्वासात घेऊन योग्य नुकसानभरपाई मिळवून देणे हे प्रशासनापुढील मुख्य आव्हान असेल.
हा मार्ग केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित नसून तो अर्थकारणाला गती देणारा ठरणार आहे :
♦ त्र्यंबकेश्वर, पंचवटी आणि शिर्डीचे साईबाबा मंदिर ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे एकाच प्रवासात जोडली जातील. यामुळे देशभरातून येणार्या भाविकांना ’टुरिझम सर्किट’चा थेट लाभ मिळेल.
♦ सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उत्पादने आणि नाशिकचा शेतमाल थेट देशाच्या इतर भागांत प्रामुख्याने दक्षिण भारतात पोहोचवण्यासाठी हा मालवाहतुकीचा एक सक्षम पर्याय बनेल.
♦ रेल्वे स्थानकांची उभारणी आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांसाठी हॉटेल, ट्रॅव्हल्स, आणि छोटे व्यवसाय या माध्यमातून हजारो नवीन रोजगार निर्माण होतील.
♦ शेकडो खासगी वाहने आणि बसेसऐवजी हजारो प्रवासी एकाच वेळी रेल्वेने प्रवास करू लागल्यास कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि रस्ते अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटेल.
नाशिक-शिर्डी रेल्वेमार्ग हा राज्याच्या दोन महत्त्वाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडणारा सुवर्णदुवा आहे. अनेक वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष आकार घेत आहे, ही उत्तर महाराष्ट्रासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. प्रशासनाने योग्य नियोजन, पारदर्शकता आणि भक्कम राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर ही प्रगतीची ’एक्स्प्रेस’ लवकरच सुसाट धावेल आणि नाशिक-सिन्नर-शिर्डी पट्ट्याच्या अर्थकारणाला एक सोनेरी झळाळी प्राप्त होईल.
Nashik-Shirdi Railway Line
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…