निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठक
नाशिक ः प्रतिनिधी
नशिकमधील रस्त्यांवर यापुढील काळात खड्डे पडणार नाही. व्हाइट टॅपिंग करण्यात येणार असून, लवकरच नाशिक खड्डेमुक्त होईल. अधिकार्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.खुनाचे प्रकार, गुंडगिरी असेल, कोणत्याही प्रकारचे गुन्हे खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये गुंडागर्दी वाढली होती ही वस्तुस्थिती आहे, असे महाजन यांनी सांगितले. ते स्वामीनारायण कन्व्हेन्शन सेंटर, आडगाव नाका, पंचवटी, नाशिक येथे संघटनात्मक बैठकीत ते उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकार्यांशी संवाद कार्यक्रमासाठी शुक्रवारी (दि. 10) आले असता माध्यमांशी बोलत होते. त्यानंतर त्यांनी शहरातील ठिकठिकाणच्या खड्डयांची पाहणी केली.
महाजन म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगर या पाच जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. महाजनांनी सांगितले की, नाशिक शहरात गेल्या पावसामुळे खड्ड्यांनी सर्वत्र कोंडी निर्माण केली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या मार्गांचे सिमेंटीकरण करण्याचा आदेश दिल्याचे सांगितले.
पोलीस कारवाईबाबत महाजनांनी कडक भूमिका मांडली. कुठल्याही पक्षाचे असतील तरी आम्ही कारवाई करू. नाशिकमध्ये गुंडगिरी वाढली होती. आता आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भूमाफियांच्या विरोधातही कोणतेही संरक्षण न देण्याचा इशारा त्यांनी दिला आणि पोलिसांना कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे नमूद केले.
ना. दादा भुसेंना पालकमंत्र्यांबाबत विचारले असता, याचे उत्तर डोनाल्ड ट्रम्प देतील, असे वक्तव्य केले होते. यावर महाजन यांनी दादा भुसे यांचे ट्रम्प यांच्याशी संबंध आहेत तर ते स्वतःच काही सांगू शकतील. हा विषय राजकीय चर्चेत आला असून, अधिक स्पष्टता राखण्यासाठी वेळ लागेल, असे त्यांनी सूचित केले.
क्लब टेंडर आणि कुंभसंबंधी कामांच्या बाबतीत महाजन म्हणाले की, काही कंत्राटदार ब्लॅक लिस्टेड आहेत.वेळेत गुणवत्ता राखून काम होणे आवश्यक आहे. कुंभाची कामे वेळेत व दर्जापूर्वक पूर्ण व्हावीत, हा आमचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. छोटा राजन व राऊत यांच्यासंदर्भात महाजनांनी टोकदार भाष्य केले. गुंडगिरीत बोलणारे आहेत. राऊतसाहेब तांडव करतात; बोट दाखवायला त्यांना आवडते, असे ते म्हणाले.
ओबीसी, मनसे आणि उमेदवारी धोरणे
ओबीसी धोरणांबाबत महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री याकडे लक्ष देतील आणि आरक्षणास हानी न पोहोचवता योग्य तो मार्ग अवलंबला जाईल. मनसेबाबत त्यांनी सुचवले की, कोणतेही गट एकत्र येणार का ते त्यांनी ठरवावे; परंतु महायुती म्हणून आम्ही एकदिलाने लढू. तसेच, गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
कारागृहातील व्हायरल व्हिडिओवर कठोर दृष्टिकोन
सध्या चर्चेत असलेल्या कारागृह व्हायरल व्हिडिओसंदर्भात महाजन म्हणाले की, असे काही आढळले तर कडक कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री कुणालाही थारा देणार नाहीत. मदत करणार्या अधिकार्यांविरोधातही कारवाई होईल, अशी हमी त्यांनी दिली.
गुन्हेगारांची गय केली जाणार नाही
नाशिक आम्हाला गुन्हेगारमुक्त करायचं आहे. याकरिता आता कारवाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. लाखो, करोडो लोकांच्या मालमत्तांवर कब्जा करायचा. घर बळकावयचे असे प्रकार वाढले आहेत. नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. मात्र, आता पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले असून, गुंड कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई करताना हयगय केली जाणार नाही, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.