कागदावरच धावतेय नाशिक दर्शन बस

सिटी लिंक कंपनीचे नियोजन संपेना
नाशिक : प्रतिनिधी
सिटी लिंक कंपनी मार्फत शहरात बससेवा सुरू करण्यात आल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी अनेक मार्गांवर बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे. नाशिक शहर हे धार्मिक पर्यटनासाठी महत्वाचे आहे. विविध राज्यातील भाविक नाशिकमध्ये पर्यटनाला येत असतात. हीच बाब हेरुन सिटी लिंकमार्फत नाशिक दर्शन बस सुरू करण्याचे कंपनीने ठरविले आहे. मात्र, अजून कंपनीचे नियोजनच सुरू असल्याने नाशिक दर्शन बसची प्रतीक्षा कायम  आहे.शहर बससेवेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सिटी लिंकच्या वतीने प्रवाशांसाठी खास बस सेवा सुरू करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी  नाशिक दर्शन या नावाची बस सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती .मात्र अजून ही नाशिक दर्शन ही बससेवा कागदावरच असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने शहरात देशभरातील पर्यटक येत आहेत. मात्र पर्यटकांना शहरालगत असलेले धार्मिक आणि पर्यटन स्थळ बघण्यासाठी खासगी वाहन अथवा रिक्षाचा वापर करावा लागत आहे. नाशिक दर्शन ही बस सेवा कधी पर्यंत सुरू होणार याविषयी सिटी लिंक व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.  फक्त  नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक दर्शन बस सेवेसाठी अजून प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरातील पंचवटी, सोमेश्‍वर या ठिकाणांबरोबरच जवळच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्‍वर आणि सप्तशृंगी गड या ठिकाणांचा नाशिक दर्शन बससेवेत समावेश केल्यास सिटी लिंकच्या उत्पन्नात वाढ तर होईलच शिवाय विविध राज्यांतून येणार्‍या भाविकांची  गैरसोय देखील दूऱ होण्यास मदत होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *