अमेरिका-इस्त्रायल -इराण युद्धाचा सर्वाधिक परिणाम शेतीमाल निर्यातदारांना व उत्पादक शेतकर्यांना भोगावा लागतो आहे. युद्धाचे चटके आता पश्चिम आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांना जाणवू लागले आहेत. मध्यपूर्वेकडील या विनाशकारी युद्धामुळे भारतासारख्या कृषिप्रधान देशाचा शेतीमाल विशेषतः कांदा, द्राक्ष, केळी, पपई या अल्पकाळ टिकणार्या मालाच्या निर्यातीवर परिणाम जाणवू
लागला आहे.
हे युद्ध जर दीर्घकाळ सुरू राहिले तर याचे भयंकर दुष्परिणाम गरीब राष्ट्रांना भोगावे लागतील. यात पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांसारखे शेजारील देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. या संघर्षाशी संबंध नसणारे देशही या युद्धात आपोआप ओढले जाऊ शकतात. त्यामुळे तिसर्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या युद्धाला तोंड
फुटून आठ दिवस झाले, त्याची झळ आता शेतमालाला पर्यायाने शेतकरी व निर्यातदार व्यापार्यांना बसताना दिसत आहे. दुबईमार्गे आखाती देशांमध्ये नाशिकचा कांदा, द्राक्ष, जळगावच्या केळी, पपई निर्यात मोठ्या प्रमाणात होते. परंतु, युद्धामुळे दुबई येथील मार्केट पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे कांदा व द्राक्ष निर्यात पूर्णतः थांबली आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) बंदरावर नाशिक, पुणे, नगर, सोलापूर आणि इतर महाराष्ट्रातील दीडशे ते दोनशे कांद्याने भरलेले कंटेनर्स निर्यातीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच द्राक्ष, केळी यांचेही निर्यातीसाठी असलेले कंटेनर अडकलेले आहेत. दुबई येथे शेतमाल स्वीकारला जात नसल्याने हजारो टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडला आहे.
कांदा निर्यात थांबल्याने देशांतर्गत कांद्याचे भाव पुन्हा घसरले आहे. लाल कांदा कंटेनरमध्ये दीर्घकाळ पडून राहिल्यास तो खराब होण्याची शक्यता जास्त आहे. शेतकर्यांवर पुन्हा रस्त्यावरचं आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते. नाशिक, सोलापूर, नगर या जिल्ह्यांतून 10 हजार टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. तसे न केल्यास, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी राज्यव्यापी चक्काजामचा इशारा दिला आहे. ऐन रमजानच्या महिन्यात भारतातील द्राक्ष, केळी, पपई या फळांना पश्चिम आशियातून मोठी मागणी असते. त्यामुळे द्राक्ष, केळी, निर्यातीवरदेखील परिणाम
झाला आहे.
यावर्षी द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकर्यांना आपली आर्थिक अडचणीतून सुटका होईल असे वाटत असताना, द्राक्षांना भाव आणि मागणी असताना निर्यातीवर परिणाम होत असल्याने निर्यातदारांचा हिरमोड होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यामधून पश्चिम आशियात एक डझनहून अधिक कंटेनर्सद्वारे केळी आखाती देशांत निर्यात केली जात आहे. ती निर्यातदेखील आता खोळंबली आहे. युद्धापूर्वी केळीला 2500 रुपये प्रतिक्विंटल भाव होता. आता तो 1200 ते 1500 रुपयांवर आला आहे. इराणमध्ये भारतातील बासमती तांदळाला मोठी मागणी आहे. युद्धामुळे पंजाब आणि हरियाणातील बासमती तांदूळ उत्पादक शेतकर्यांना याचा मोठा फटका बसला आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. शेतमाल घेऊन गेलेले महाराष्ट्रातील 370 कंटेनर्स सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. यात कांदा, मका, मिरची, टोमॅटो, पपई या नाशवंत मालाचा समावेश आहे. इराणमधून भारतात सुकामेवा, खजूर, काजू, बदाम, पिस्ता आयात केला जातो. युद्धामुळे आयात होणार्या सुकामेव्याच्या किमतीत भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील क्रॉफर्ड आणि वाशी मार्केटमध्ये आयात सुकामेवा येत असतो. इराण रासायनिक खतांचा उत्पादक देश असल्याने खतांच्या किमतीदेखील वाढू शकतात. भारताचा पश्चिम आशियाशी होणारा मोठा व्यापार हा सामुद्रधुनीमार्गेच होतो. इराणने ही सामुद्रवाहतूक बंद केली आहे. परिणामी, भारताचा जवळपास 50 टक्के व्यापार बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच गॅस व पेट्रोलियम पदार्थांचा आयातीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इंधन दरवाढ होऊ शकते. युद्ध लांबल्यास पेट्रोल आणि डिझेलची गरज भागवण्यासाठी भारताला रशियाकडे मदतीसाठी हात पसरावे लागतील. कच्च्या तेलाचे भाव शंभर रुपये प्रतिडॉलरपर्यंत गेले आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर कतार एनर्जी कंपनीने एलएनजीचे उत्पादन थांबवले आहे. कतार जगातील एलएनजी उत्पादन करणारा पाचवा देश आहे. त्यांनीच उत्पादन थांबवल्याने गॅसच्या दरात वाढ झाली आहे.
भारत आखाती देशांतून 80 टक्के एलपीजीची आयात करतो. भारताकडे कच्च्या तेलाप्रमाणे गॅसचा राखीव साठा नाही. यामुळे एलपीजी आणि एलएनजीसाठी भारताला नवे पर्याय शोधावे लागतील. भारताकडे सध्या 90 दिवस पुरेल एवढा तेलाचा साठा आहे. या युद्धामुळे सोने-चांदीचे दरदेखील उचांकी पातळीवर जाऊन भिडतील, शेअर बाजारामध्ये रोज पडझड सुरू आहे. परदेशात अडकलेल्या नागरिकांबरोबरच आखाती देशांत अडकलेल्या शेतमालाच्या निर्यातीबाबत तसेच गॅस, डिझेल, पेट्रोल आयातीबाबत भारताला प्रभावी उपाययोजना करावी लागणार आहे. आखाती देशांतील युद्धाचे ढग अधिकच गडद होत आहेत. त्यामुळे तिसर्या महायुद्धाच्या खाईत संपूर्ण जग ओढले जाणार नाही, याची काळजी युनोने घेणं
आवश्यक आहे.
Nashik’s onion is burning in the Gulf War!
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…