‘एनडीएसटी’ची वार्षिक सभा वादळी ठरणार

नाशिक : प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या एनडीएसटी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता होणार आहे. संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्यानंतर कन्यादान योजनेचे फोटोसेशन, नोकरभरती, आश्रमशाळा कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष आदी विविध मुद्यांवरून ही सभा वादळी होणार आहे. सोसायटीची ही विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळातील अखेरची सभा आहे. त्यामुळे या सभेला निवडणुकीचीही किनार लाभली आहे. त्यामुळे विरोधकांकडून या सभेत संचालक मंडळाला धारेवर धरले जाऊ शकते. सभासदांकडून उपस्थित होणार्‍या मुद्यांना विद्यमान संचालक कशा पद्धतीने हाताळतात? याकडे लक्ष लागले आहे.
सध्याच्या संचालक मंडळाने पारदर्शी कारभार केला असल्याने ही सभा आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात घेऊ, असे आश्‍वासन शिक्षक नेते साहेबराव कुटे, आर. डी. निकम, अनिल निकम, के. के. अहिरे, डी. यू. अहिरे, संग्राम करंजकर, किरण पगार, गुलाब भामरे, रोहित गांगुर्डे, बी. एन. देवरे, प्र. दा. पगार, बाळासाहेब भोसले, विजय पाटील, सचिन शेवाळे, डी. एस. अहिरे, राजेंद्र लोंढे, संजय पाटील, दत्ता वाघे, शरद सांगळे, अरुण आहेर, नीलेश ठाकूर, विनायक लाड यांनी पत्रकान्वये कळवले आहे. या संचालक मंडळाने सोसायटीचे नाव एसीबीच्या यादीत पाठवून संस्थेला नावलौकिक प्राप्त करून दिला. नोकरभरती करून सभासदांची कर्जाची प्रतीक्षा यादी वर्षाऐवजी सहा महिन्यांवर आणून ठेवली. सभासद यादीतून दोन हजार सभासद वगळल्यामुळे निवडणूक खर्च कमी केला. कन्यादान योजनेच्या फोटोसेशनमुळे एनडीएसटी सोसायटीचा सर्व दूर परिचय करून दिला. इतिहासात पहिल्यांदा संगणक खरेदी टाळून नोकरभरतीला प्राधान्य दिले. जिल्हाभरात शाखांचे जाळे वाढवून सभासदांना कर्जाला होणारा त्रास सहा महिन्यांनी कमी केला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ या न्यायाने संघटना गठीत करून एक चांगले काम केले. संचालक मंडळाच्या गाडी दुरुस्तीवरील खर्च संचालकांच्या खिशाला बोजा पडू नये अशी व्यवस्था केली. प्रोसिडिंग हवे त्याला हवे तिथे नेण्याची मुभा दिली. 392 कोटी रु. कर्ज वाटप करून त्यावर 27 कोटी रु. व्याज मिळवले. त्यातून 9 कोटी एवढा विक्रमी नफा वाटण्यास मंजुरी घेण्याचे ठरले. फक्त 8 कोटी रु. इतक्या तुटपुंज्या रकमेवर सोसायटीचा वार्षिक खर्च भागवून सोसायटीला ऊर्जितावस्थेत आणून ठेवले. सभासदांच्या हिताची व कर्मचारी हिताच्याही अनेक चांगल्या योजना संचालक मंडळाने राबवल्याने सभासद खुश आहेत, अशी उपहासात्मक टीका विरोधकांनी
केली आहे.
विरोधकांचे पत्रक
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची सर्वांत मोठी समजल्या जाणार्‍या एनडीएसटी सोसायटी सभेला आमचे समर्थक उपस्थित राहून खेळीमेळीच्या वातावरणात सहभाग घेतील, असे उपहासात्मक पत्रक सोसायटीचे माजी कार्यवाह साहेबराव कुटे व शिक्षकेतर संघटनेचे नेते संग्राम करंजकर यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *