संपादकीय

नव्या वर्षासाठी नवा संकल्प!

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना आपल्यापैकी अनेक जण आत्मचिंतन करतात. सरत्या वर्षासाठी आपण कोणकोणते संकल्प केले होते, त्यांपैकी किती पूर्ण झाले आणि किती शेष आहेत, केलेले संकल्प पूर्ण न होण्यामागे नक्की कोणकोणते अडथळे आले आणि त्यासोबतच येणार्‍या वर्षात आपल्याला कोणकोणती शिखरे किती काळात गाठायची आहेत, येणार्‍या अडचणींवर कशाप्रकारे मात करायची आहे, याचे गणित मांडतात.
हे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागणार आहेत, याची जंत्री बनवतात. दरवर्षी केले जाणारे हे संकल्प बर्‍याचदा व्यावहारिक स्वरूपाचे असतात. विद्यार्थी एखादी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा संकल्प करतात, व्यावसायिक आपल्या व्यवसायात अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचा, व्यवसाय वाढवण्याचा संकल्प करतात, कार्यालयीन कर्मचारी कार्यालयात प्रमोशन आणि वेतनवृद्धी मिळवण्याच्या दृष्टीने संकल्प करून त्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची सूची बनवतात, नवीन गाडी, घर किंवा एखादी महागडी वस्तू विकत घेण्याचा संकल्प करतात, स्त्रीवर्ग येत्या वर्षात नवीन दागिना, वस्तू विकत घेण्याचा, पैसे बचतीचा संकल्प करतात. दरवर्षी केले जाणारे हे संकल्प पुढील काही दिवस आपल्या प्रयत्नांना ऊर्जा देण्याचे कार्य करत असतात.
जीवनात यश-अपयश येण्यामागे जसे आपले नशीब कारणीभूत असते तसे आपले गुण आणि दोषही कारणीभूत असतात. आपल्यापैकी किती जण वर्षाअखेरीस आपल्यात असलेल्या आणि वर्षभरात वाढलेल्या दोषांचे चिंतन करतात आणि हे दोष घालवण्यासाठी, आपल्यात नसलेले गुण आणण्यासाठी आणि अल्प प्रमाणात असलेल्या गुणांच्या वृद्धीसाठी प्रयत्न करतात? आपल्यामध्ये अनेक दोष आहेत आणि ते वेळोवेळी उफाळून येतात. या दोषांमुळे आपले अनेकदा नुकसान होते, चुकीचे निर्णय घेतले जातात ज्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येते हे प्रत्येकालाच ज्ञात असते. मात्र, या दोषांची सूची बनवून येणार्‍या वर्षात हे दोष कमी करण्यासाठी आणि सोबत आपल्यात नवनवीन गुण आणण्याच्या दृष्टीने आपण संकल्प करतो का? यंदा असा संकल्पही करून पाहूया.दोषासोबत आपल्याला असलेल्या चुकीच्या सवयी, व्यसने यांची सूची बनवूया आणि त्यांपैकी किती दोष आणि सवयी येणार्‍या वर्षात कमी करायच्या, त्यासाठी कोणकोणते प्रयत्न करायला हवेत, कोणाकोणाचे सहाय्य घ्यायला हवे हेही लिहून काढूया आणि त्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न करूया.
वैयक्तिक स्तरावर संकल्प करताना काही सामाजिक स्तरावरील संकल्पही यावर्षी करूया. अनेक व्यक्तींचा मिळून समाज बनतो. आपण प्रत्येक जण समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे सर्वस्वी समाजावर अवलंबून आहे. त्यामुळे तो निरोगी, सुदृढ आणि सशक्त असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजमितीला या समाजाला अनेक दुष्प्रवृत्तींनी ग्रासले आहे, ज्याचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकाला भोगावा लागत आहे. भ्रष्टाचार, गुंडगिरी, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलांचे शोषण, जातीपातीतील तंटे, तरुणांमधील व्यसनाधीनता, प्रमुख शहरांना पडत चाललेला अमली पदार्थांचा विळखा, ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सना बळी पडत चाललेली तरुणाई, टीव्ही आणि गेम्स आदींच्या नादात लहान मुलांचे हरवत चाललेले बालपण, फास्टफूड, जंक फूड आदींच्या आहारी गेल्यामुळे वाढत चाललेली आजारपणे, भाज्या-फळे, धान्य, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने यांमधील भेसळ, अन्नपदार्थांत वाढत चाललेला रसायनांचा वापर, बनावट औषधाचे वाढते स्तोम, घरभेदी सिरीयल्स, अश्लील-हिंसक वेबसिरीज आणि चित्रपट, मोबाइलमध्ये गुंतत चाललेले जीवन या सर्वांचा परिणाम म्हणून नातेवाईक आणि मित्र परिवार यांतील हरवत चाललेला सुसंवाद, पोलीस, डॉक्टर, वकील, शिक्षक ज्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवला जात असे अशांमध्ये काही प्रमाणात पसरत चाललेली विश्वासघातकी वृत्ती यांसारख्या अनेक समस्या आज सामाजिक स्तरावर भेडसावत आहेत.
ज्याचा परिणाम कुठेना कुठे प्रत्येकाच्या जीवनावर पडत आहे. यासाठी राजकीय मंडळी किंवा सरकार काही करेल ही अपेक्षा करण्यापेक्षा या सर्वांच्या निर्मूलनासाठी मी काय करू शकतो याचा विचार सरत्या वर्षाला निरोप देताना प्रत्येकाने करायला हवा. समाजात पसरलेल्या या विविध रोगाना मी किंवा माझे कुटुंबीय, माझा मित्रपरिवार यांपैकी कुणी बळी पडला आहे का, याचा शोध घेऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी मी काय करायला हवे, याचे चिंतन करून त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. माझा समाज सुधारण्यासाठी आणि त्याचे स्वास्थ उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करण,े हे माझे सामाजिक कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवून त्यासाठी मी काय करू शकतो यादृष्टीने
येत्या वर्षाकरिता संकल्प करून पाहूया.
महाराष्ट्र भूमी ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे, ज्यांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या बळावर पाच पाटशाह्यांना लोळवले. अत्याचारी यवनांचे सामाज्य उद्ध्वस्त करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ही भूमी देशभक्त क्रांतिकारकांची आहे, ज्यांनी भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवले, प्रसंगी प्राणाचे बलिदान दिले. ही भूमी समाजसुधारकांची आहे, ज्यांनी सामाजिक दुष्प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. या सर्वांचा आदर्श घेऊन नवीन वर्षात वैयक्तिक प्रगतीचे संकल्प करताना सामाजिक सुधारणेचाही संकल्प करूया. आज ना उद्या समाजातील पालट आपल्याला नक्कीच जाणवेल.

New resolution for the new year!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago