पारा 6.1 अंशांवर, वाडी-वस्तीवर पेटल्या शेकोट्या
निफाड : तालुका प्रतिनिधी
नोव्हेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या थंडीत
दिवसागणिक वाढ होत असून, गुरुवारी (दि. 11) निफाड गहू कृषी संशोधन केंद्रावर 6.1 अंश तापमानाची नोंद झाली. अवघा तालुका थंडीने गारठू लागला आहे. थंडीपासून बचावासाठी तालुक्यातील खेडेगावात तसेच वाडी-वस्तीवर शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना बालगोपाळांसह वयोवृद्ध नागरिक दिसून आले. थंडीत वाढ झाल्याने स्वेटर, मफलरला मागणी वाढली आहे.
आठवड्यात थंडीचा माहोल कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. दिवसागणिक थंडीत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. द्राक्षबागेत चिपाटे पेटवून उष्णता तयार करू लागले आहेत. थंडीमुळे द्राक्षवेलींची अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता कमी झाली असून, थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ झाली तर द्राक्षमण्यांना तडे जाणे, पाने करपणे, असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. सध्याची थंडी गहू, हरभरा, कांदा पिकासाठी लाभदायक असली तरी आणखी थंडीत वाढ झाल्यास कांदापात करपणे, गहू आडवा पडणे, असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. उत्तरेकडून येणार्या वार्यामुळे थंडीत वाढ झाल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरवर्षी डिसेंबरअखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीस थंडीच्या प्रमाणात वाढ होत असते. यंदा मात्र थंडीने नोव्हेंबरमध्येच आपले रूप दाखवले असून, सुरू झालेला थंडीचा माहोल मार्चपर्यंत कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. सध्या तालुक्यात कांदा लागवडीसह शेती मशागतीची कामे सुरू असून, वाढत्या थंडीचा परिणाम होताना दिसत आहे.