अजितदादा पवार यांचे बुधवार, दि. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. हा दिवस बारामतीच्या इतिहासातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिला जाईल. गुरुवारी दादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, मीडियात आणि सोशल मीडियात एकच चर्चा होती ती केवळ दादांची. राजकारणातील लाडका ‘दादा’, शब्दाला पक्का असलेला नेता, पहाटेच उठून कामाला लागणारा माणूस, कोणत्याही फाइलवर त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असलेली सक्षम व्यक्ती, प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व, रोखठोकपणा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा पवार. गुरुवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी बारामतीच्या मातीत अजितदादांची अखेर झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला तेव्हा अवघा महाराष्ट्र हळहळला. दादांच्या अखेरच्या दर्शनासाठी बारामतीत लोटलेल्या जनसागराने ‘परत या, परत या, अजितदादा परत या’, ‘अजित पवार अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. महाराष्ट्र पोलिस दलाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत आणि बिगुल वाजवत अजितदादांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व नेते, अनेक केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दादा पंचतत्त्वात विलीन झाले असले, तरी त्यांच्या आठवणी मराठी माणसांच्या मनांत कायम राहतील. दादांच्या अपघाती निधनाच्या बातमीने गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांचीच नव्हे, तर त्यांनी केलेल्या कार्याच्या आठवणी सर्वसामान्यांच्या मनांत जाग्या झाल्या. दादा पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांचे कार्य, त्यांनी विविध घटकांसाठी घेतलेल्या निर्णयांनी अजितदादांची आठवण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कायम राहील. दादांनी समाजातील सर्वच घटकांचा विचार केला. आपल्या चाहत्यांना, कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातील आम जनतेला शोकसागरात बुडवून दादा पंचतत्त्वात विलीन झाले. आता त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. दादांच्या अकाली निधनाने ‘पवार परिवारावर आघात’ असे कालच या सदरात म्हटले होते. दादांनी ज्यांच्या पदरात काहीना काही टाकले, त्यांनाही आघात बसला आहे. सहकार, राजकीय क्षेत्रांखेरीज क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. अभ्यासू वृत्ती, वक्तशीरपणा यामुळे त्यांचा प्रशासनात व समाजातही वचक होता. लोकांच्या दुखर्या नसेवर हात ठेवणारा नेता गेला. बदललेल्या राजकारणाची व समाजकारणाची उत्तम जाण अजितदादा यांना होती. विधानसभेत सदस्य असल्यापासून प्रशासकीय व्यवस्थेचा त्यांनी शरद पवार यांच्या साक्षीने अभ्यास केला होता. त्यामुळे मंत्री म्हणा की, उपमुख्यमंत्री बनल्यावर निर्णय घेणे व ते राबवणे त्यांना अवघड कधीच गेले नाही. सत्तेत असोत अथवा नसोत, तळागाळातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने अजितदादा यांची जनमानसावरील पक्कड कायम होती. जनमानसावर पक्कड बसविण्याचे कौशल्य त्यांनी काका शरद पवार यांच्याकडूनच अवगत केले होते. आधुनिक काळातील ते आधुनिक विचारांचे नेते होते. शेती असो अथवा जलसिंचन किंवा अन्य प्रकल्प असोत, सर्वत्र आजचे नवे तंत्रज्ञान वापरण्यावर त्यांचा कटाक्ष असे. काम वेगाने झाले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे ते बर्याचदा अनेकांची नाराजीही ओढवून घेत; पण त्याची त्यांनी फिकीर केली नाही. अत्यंत स्पष्टवक्तेपणा किंवा परखडपणा हा अजितदादा यांचा एक विशेष गुण होता. राजकारणात हा अवगुण मानला जातो; मात्र त्याचीही त्यांनी कधी पर्वा केली नाही. ज्या सत्ताधारी युतीचा ते भाग होते, त्या युतीला गेल्या महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत आव्हान देण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखवले. त्याच्या राजकीय परिणामांचा त्यांनी विचार केला नाही. अशी साहसी वृत्ती राजकारणात अभावानेच दिसते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री होते. महायुतीत गेल्यानंतर त्यांनी वित्त (अर्थ) व नियोजन विभाग हट्टाने मागवून घेतला. सन 2024 च्या लोकसभा निवडणुकांत महायुतीला महाविकास आघाडीने जबरदस्त दणका दिला. यानंतर विधानसभा निवडणुकांत आपले म्हणजे महायुतीचे काही खरे नाही, याची जाणीव एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व दस्तुरखुद्द अजित पवार यांना झाली होतीच. विधानसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर अर्थसंकल्पात लोकप्रिय तरतुदी करणे हेच आपल्या हाती असल्याचा साक्षात्कार तिन्ही नेत्यांना झाला. पण, लोकप्रिय घोषणा करण्याची जबाबदारी आली ती अजितदादांवर. ती त्यांनी लीलया पार पाडली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सन 2024 च्या मार्च-एप्रिल महिन्यांत दादांना पूर्ण अर्थसंकल्प सादर करता आला नाही. त्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर 28 जून 2024 रोजी दादांनी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. याच अर्थसंकल्पात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. हीच योजना 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. महायुती पुन्हा सत्तेत आली. ही दादांचीच करणी होती. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय अर्थसंकल्प सादर करताना दादांनी शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांच्या पदरात काहीना काही टाकले होते. याशिवाय शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देण्याचा प्रयत्नही केला होता. विशेषतः महिला, युवक/विद्यार्थी, शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आधीपासूनच सुरू असलेल्या लेक लाडकी योजनेला लाडकी बहीण योजनेची जोड देऊन त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली. अभियांत्रिकी, वास्तुशास्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आणि आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. स्वयंपाकी गॅसच्या किमतीकडे महिलांचे विशेष लक्ष असते. याचा विचार करून त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करून पात्र लाभार्थींना वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याचा मोठा निर्णय घेतला. विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजनेच्या निधीत 10 हजारांवरून 20 हजार रुपये वाढ करण्यात आली. महिलांसाठी 10 हजार पिंक रिक्षा देण्याचाही निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 10 मार्च 2025 रोजी सादर करताना त्यांनी विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले. केंद्र सरकारच्या धर्तीवर ‘विकसित भारत’प्रमाणे ‘विकसित महाराष्ट्र’ ही संकल्पना त्यांनी मांडली होती. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुतीने ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी टॅगलाइन देऊन जाहिरात केली होती. त्या टॅगलाइनला ‘विकास आता लांबणार नाही’ अशा नवीन टॅगलाइनची जोड त्यांनी दिली होती. सन 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ अगदी जवळ आली असताना, दादांनी अर्थसंकल्पाची तयारीही केली असेलच. पण, काळाने डाव असा साधला की, बाराव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी दादांना दिली नाही.
Now the memories remain.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…