वाढती उष्णता, शरीरावर होणारे परिणाम
आणि घ्यावयाची काळजी…
ऑक्टोबर महिना सुरू झाला की, पावसाळा संपत असतानाच अनेक ठिकाणी अचानक उष्णता वाढल्याचे जाणवते. दिवसा कडक ऊन, वातावरणातील दमटपणा आणि रात्री तुलनेने उष्ण हवामान यामुळे शरीराला तापमानाशी जुळवून घेण्यास त्रास होऊ शकतो. या काळातील वाढलेल्या उष्णतेला सामान्यतः ऑक्टोबर हीट असे म्हटले जाते.
ऑक्टोबर हीटमुळे शरीरावर हे होतात परिणाम :
जास्त घाम येणे व शरीरातील पाणी कमी होणे.
जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी, तसेच सोडियम-पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात. त्यामुळे अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी, तोंड कोरडे पडणे आणि थकवा जाणवू शकतो. उष्णता, कमी पाणी पिणे, उन्हात जास्त वेळ राहणे किंवा झोपेचा अभाव यामुळे डोकेदुखी आणि गरगरणे होऊ शकते. उष्ण वातावरणात जड, तिखट, तेलकट पदार्थांचे सेवन वाढल्यास छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोट फुगणे, अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारखे त्रास वाढू शकतात.
उष्णतेमुळे शरीराला तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे काम करताना लवकर थकवा येणे किंवा ऊर्जा कमी वाटणे शक्य आहे.
जास्त घाम आणि दमटपणामुळे घामोळे, खाज, त्वचेवर पुरळ, तसेच बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो. विशेषतः बगल, जांघा, पायांच्या बोटांमध्ये आणि त्वचेच्या घड्यांमध्ये हा त्रास अधिक होऊ शकतो.
ऑक्टोबरमध्ये दिवसाचे तापमान आणि सकाळ-संध्याकाळचे वातावरण यात फरक पडू शकतो. तापमानातील बदल, धूळ आणि प्रदूषणामुळे काही व्यक्तींना घसा खवखवणे, सर्दी किंवा खोकला जाणवू शकतो.
अतिउष्णतेमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी रक्तवाहिन्यांमध्ये बदल होतात आणि हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी उष्णतेपासून विशेष काळजी घ्यावी.
आयुर्वेदात ऋतू बदलाच्या काळाला विशेष महत्त्व आहे. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलामुळे पित्तदोषाचा प्रकोप होण्याची शक्यता सांगितली जाते. त्यामुळे अंगाची आग, आम्लपित्त, तहान, चिडचिड, जळजळ, त्वचेचे विकार आणि पचनाशी संबंधित तक्रारी काही व्यक्तींमध्ये वाढू शकतात. यासाठी ऋतुनुसार आहार-विहार करणे, शरीराला पुरेसे द्रव मिळवून देणे आणि अतितिखट-तेलकट पदार्थांचे सेवन कमी करणे उपयुक्त ठरते.
ऑक्टोबर हीटमध्ये काय काळजी घ्यावी?
तहान लागण्याची वाट न पाहता दिवसभर पुरेसे पाणी प्या. उन्हात बाहेर पडताना डोके झाकावे आणि शक्यतो दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. हलका, ताजा आणि सहज पचणारा आहार घ्यावा. फळे, भाज्या आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ आहारात ठेवावेत. अतितिखट, अतितेलकट आणि खूप जड पदार्थांचे सेवन कमी करावे.भरपूर झोप आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. जास्त घाम येत असल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता होणार नाही याची काळजी घ्यावी.त्वचा कोरडी व स्वच्छ ठेवावी आणि घामाने ओले कपडे शक्य तितक्या लवकर बदलावेत.
अतिशय जास्त अशक्तपणा, बेशुद्ध पडणे, सतत उलट्या, संभ्रम, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, शरीराचे तापमान खूप वाढणे किंवा लक्षणे कमी न होणे अशा परिस्थितीत केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
October Heat