आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या विधिसंघर्षित बालकावर गुन्हा

 

इंदिरानगर : वार्ताहर
धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍या विधिसंघर्षित बालकावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परराज्यातून नाशिकमधील भाभानगर परिसरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या कुटुंबातील विधिसंघर्षित बालकाने धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल केल्याने परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.


पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा येथील निखिल पाटील यांच्या इंस्टाग्रामच्या आयडीवर आक्षेपार्ह पोस्ट आली. ही पोस्ट हिंदू धर्माच्या भावना दुखावणारी असून, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व्हायरल करण्यात आली असल्याचे लक्षात आल्यानंतर या अकाउंटची चौकशी करण्याची मागणी निखिल पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली.
इंदिरानगर परिसरातील हिंदू युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.22) मध्यरात्री पोलीस ठाण्यात धाव घेऊन ही पोस्ट टाकणार्‍या युवकास अटक करावी, अशी जोरदार मागणी केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित सोशल मीडियावर पोस्ट टाकणार्‍याचा शोध घेतला असता विधिसंघर्षित बालकाने ही पोस्ट व्हायरल केल्याचे लक्षात आले. त्याच्या पालकांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सध्या तो नाशिकमध्ये नसल्याचे तपासाअंती समजले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन पुढील अनर्थ टळल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *