सरकारच्या नावे शोक संमेलन; विविध उपक्रम
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामच्या उभारणीसाठी तपोवनातील शेकडो डेरेदार झाडांंवर कुर्हाड चालविण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यास विरोध करण्यासाठी येथे रोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. या वृक्षहत्येच्या सरकारी निर्णयाचा निषेध करण्यासाठी आता महाराष्ट्रातील संवेदनशील कवी आणि साहित्यिक सरसावले आहेत. याचाच भाग म्हणून रविवारी (दि. 7) तपोवनातील साधुग्रामच्या जागेवर ‘झाडांसोबत एक कविता, एक दिवस’ या घोषवाक्याने सरकारच्या नावे शोक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिकमध्ये सन 2027 मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधुग्राम प्रकल्पासाठी 1,800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर येताच संतापाची लाट उसळली. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1,150 एकरावर साधुग्राम उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाला नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना, तसेच अनेक कलाकारांनी जोरदार विरोध केला आहे. यावेळी माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ, निरंजन टकले, राजू देसले, मनोहर अहिरे, जयंत खडताळे आदी उपस्थित होते.
आगळेवेगळे कविसंमेलन
तपोवनातील झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लढा देत आहेत. रोज विविध उपक्रम राबवून प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे. या लढ्याला बळ देण्यासाठी आणि निसर्गाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘झाडांसोबत एक कविता, एक दिवस’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे संमेलन रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत तपोवनातील नियोजित वृक्षतोडीच्या ठिकाणी पार पडले
विशेष म्हणजे, तपोवनातील वृक्षतोडीला विरोध हा केवळ स्थानिक राहिला नसून त्याला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे. या शोक संमेलनाचे आयोजन नांदेड येथील प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख आणि पुण्यातील मंगेश काळे यांनी पुढाकार घेऊन केले. झाडांच्या वेदना मांडण्यासाठी आणि सरकारी अनास्थेवर शब्दांचे असूड ओढण्यासाठी राज्यभरातून कवी नाशिकमध्ये दाखल झाले. यात नाशिकचे ज्येष्ठ कवी अरुण गवळी, सत्यजित पाटील, श्रीकांत ढेरंगे, अण्णासाहेब जगताप यांच्यासह अनेक मान्यवर कवी सहभागी होेते. एरवी साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी संमेलने होतात, पण निसर्गाचा र्हास होत असताना सरकारच्या संवेदना मेल्या आहेत, असे मानून हे अनोखे शोक संमेलन भरवण्यात आले होतेे. हा निर्णय मागे घेण्यासाठी समाज म्हणून आपण गप्प बसू शकत नाही, ही भूमिका घेऊन साहित्यिक रस्त्यावर उतरले आहेत.
या संमेलनात कवी आपल्या कवितांमधून निसर्गाचे महत्त्व, झाडांचे दुःख आणि मानवी स्वार्थ यावर भाष्य करत आहेत. प्रशासनाने वृक्षतोडीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी हा शब्दांचा सत्याग्रह आहे.
ग्लोबल व्हिजनतर्फे पथनाट्य
प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी आणि तपोवन ही भूमी प्राचीन काळापासून अत्यंत पवित्र मानली जाते. श्रीरामांनी अनेक वर्षे तपोवनात वास्तव्य केल्याचा पुराणांत उल्लेख आढळतो. अशा या पवित्र स्थळावर कुंभमेळा-2027 साठी साधुग्राम उभारण्याच्या तयारीदरम्यान सुमारे 1,800 झाडांवर कुर्हाड चालविण्यात येणार आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने हा गंभीर विषय असून, नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्लोबल व्हिजन स्कूल, अंबड, नाशिक येथील विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून ‘ही 1700 झाडे वाचवा’ असा दमदार संदेश दिला. झाडे ही केवळ हिरवाईचे प्रतीक नसून मानवाच्या जीवनासाठी आवश्यक असलेली ‘फुफ्फुसे’ आहेत, हे त्यांनी प्रभावी अभिनयातून मांडले. हे पथनाट्य शाळेतील कमांडोज् विद्यार्थ्यांनी सादर केले. अभिनय, घोषवाक्ये व प्रभावी संवादांच्या माध्यमातून या छोट्या सैनिकांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समाजासमोर अधोरेखित केले. या कार्यक्रमात ग्लोबल व्हिजन शाळेच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी संत तुकाराम महाराजांचा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा अभंग उद्धृृृत करत वृक्षसंवर्धनाचे आध्यात्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट केले. ‘वृक्ष हे आपले निसर्गस्नेही नातेवाईक आहेत, त्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ असे त्यांनी सांगितले. पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ठामपणे मांडले की, वृक्षतोड थांबवली गेली पाहिजे. कारण झाडे ही मानवी विकासासाठीच नव्हे तर मानवी अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहेत. विद्यार्थ्यांचा हा आवाज प्रशासन आणि समाजमनाला नक्कीच स्पर्श करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
आज भजनी मंडळाचे आंदोलन
तपोवनातील सुमारे 1,800 विविध झाडांची कत्तल करण्यास प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध म्हणून मागील अनेक दिवसांपासून विविध सेवाभावी संघटना आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून समस्त वारकरी संप्रदाय नाशिक जिल्हा आता पुढे आला आहे. नाशिक जिल्ह्यातील वारकरी महिला भगिनी, तसेच नित्यनेमाने पंढरपूरची तसेच त्र्यंबकेश्वरची वारी करणारे वारकरी आज, सोमवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता संत जनार्दन स्वामी मठ, छत्रपती संभाजीनगर रोड येथून भजनी मंडळ आंदोलनास प्रारंभ करून वृक्षतोडीला विरोध करणार आहेत.
दिवसभर चालणार्या या भजनी मंडळ आंदोलनात वारकरी, तसेच समविचारी संघटनादेखील सहभागी होणार आहेत. मात्र, या आंदोलनाचे नेतृत्व नाशिक जिल्हा वारकरी संप्रदाय करणार आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानचे विद्यमान विश्वस्त प्रा. डॉ. अमर ठोंबरे, तसेच अंजनेरी (त्र्यंबकेश्वर) येथील वैकुंठवासी आचार्य हभप जगन्नाथ महाराज पवार संस्थानचे विश्वस्त संपत महाराज धोंगडे, वारकरी सेवा समितीचे जिल्हाप्रमुख आणि पत्रकार राजेंद्र भांड आदी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. पसायदानाने या आंदोलनाची दुपारी चार वाजता सांगता करण्यात येईल.
नाशिक : प्रतिनिधी पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्यांकडून विविध प्रयोगांच्या माध्यमातून उत्पादकतेत वाढ होते.…
नियोजनाचा दुष्काळ; 18 वर्षांपासून पाणीटंचाईचा फेरा त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी दक्षिण भारताला सुजलाम् सुफलाम् करणार्या गोदावरीच्या…
नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिक तालुक्यातील जाखोरी गावात श्रीदत्तात्रेय, हनुमान व बिरोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या…
मुंबई : रविवारी संध्याकाळपर्यंत इंडिगो विमान कंपनीने प्रवाशांना एकूण 610 कोटींचे परतफेड (रिफंड) प्रक्रिया केली…
पंचवीस जणांचा मृत्यू ; क्लब मालकाला अटक पणजी : पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गोव्यात आगीची…
नाशिक : प्रतिनिधी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल तब्बल अठरा ते वीस दिवस लांबल्यामुळे निवडणुकीतून उसंत मिळालेले…