कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांचे दहा हजार कोटींचे नुकसान
लासलगाव:समीर पठाण
केंद्र सरकारने 7 डिसेंबरला केलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात प्रचंड घसरण होऊन गेल्या पावणेदोन महिन्यांमध्ये कांदा उत्पादकांचे दहा हजार कोटींचे नुकसान झाल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी मांडली.आज सोमवारी सकाळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दोन तास कांद्याचे लिलाव बंद पाडले.या वेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात भारत दिघोळे बोलत होते
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी तत्काळ हटवावी तसेच सात डिसेंबर पासून कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना कांदा दर घसरणीमुळे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून कांद्याच्या दरातील फरक म्हणून केंद्र सरकारने प्रतिक्विंटल दोन हजार रुपयाची शेतकऱ्यांना थेट मदत करावी अशीही मागणी यावेळेस दिघोळे यांनी केली.
सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या लिलाव आवारात कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला मिळणाऱ्या कमी दराच्या विरोधात संतप्त होत कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली भारत दिघोळे व कांदा उत्पादकांनी दोन तास कांद्याचे लिलाव बंद पाडून केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.सुमारे दोन तास कांद्याचे लिलाव रोखण्यात आले होते.यावेळी कांदा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले,अक्षय पालवे,नितीन सुडके, बाळा कोल्हे,निलेश ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.
विंचूर बाजार समितीत देखील कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली दिघोळे यांच्या उपस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून तत्काळ कांदा निर्यात बंदी उठवावी ही मागणी केली