महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाल्याची चर्चा जोर धरत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने राज्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. या घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये खासदार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी दिल्ली गाठून स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली.
लोकसभा अध्यक्षांनी या गटाला मान्यता दिल्याने या राजकीय घडामोडींना अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये घेतलेली भूमिका ही केवळ सत्तेसाठी नसून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना न्याय देण्यासाठी असल्याचे ते सातत्याने सांगत आले आहेत.त्यानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. आता या सहा खासदारांच्या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वास आणखी दृढ झाल्याचे दिसून येत आहे. राजकारणात विचार आणि नेतृत्व यांना मोठे महत्त्व असते.कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी ज्या नेतृत्वाकडून स्पष्ट भूमिका, विकासाची दिशा आणि संघटनात्मक बळ अपेक्षित करतात, त्या निकषांवर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व प्रभावी ठरत असल्याचे समर्थकांचे मत आहे. केंद्रातील नेतृत्वासोबतचा समन्वय, महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांना मिळालेली गती आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका यामुळे शिंदे यांची राजकीय स्वीकारार्हता वाढल्याचेही बोलले जात आहे.
या घडामोडी केवळ पक्षीय राजकारणापुरत्या मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व, विकास आणि जनतेशी थेट नाळ जोडणारे राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, या घडामोडींना अधिक बळ देणारी बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला असतानाही संबंधित सहाही खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वापासून दूर गेल्याचे संकेत आधीच मिळाले होते.
त्यानंतर स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आणि अखेर चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले. खासदार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोकसभा अध्यक्षांकडून स्वतंत्र गटाला मान्यता मिळाल्यानंतर या निर्णयाला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले असून, शिवसेनेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची ताकद, संघटनात्मक क्षमता आणि पक्षातील वाढता प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे. अनेक लोकप्रतिनिधी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत असल्याचे चित्र दिसत असून, ‘ऑपरेशन टायगर’ हे केवळ राजकीय समीकरण बदलणारे अभियान नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या अध्यायाचे प्रतीक ठरत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
‘Operation Tiger’ proved to be a game-changer.