भोंदू अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत विरोधक आक्रमक, भास्कर जाधवांची टीका

मुंबई :
महाराष्ट्रात सध्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाच्या व अघोरी कृत्यांच्या प्रकरणाने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणाचे पडसाद आता थेट राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले असून, विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. भोंदू खरातसोबतचे लागेबांधे समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असून, यामुळे सत्ताधारी पक्षाची मोठी अडचण झाली आहे. सोमवारी (23 मार्च) विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी अशोक खरात प्रकरणावर जोरदार चर्चा घडवून आणली. रूपाली चाकणकर या खरातला आपला ‘गुरू’ मानत होत्या आणि त्यांची पाद्यपूजा करतानाचे तसेच खरातवर छत्री धरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. केवळ एका राजीनाम्याने हे प्रकरण शांत होणार नाही, तर खरातला संरक्षण देणार्‍या मंत्र्यांची आणि अधिकार्‍यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.या चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सत्ताधार्‍यांवर बोचरी टीका केली. महाराष्ट्राला संतांची आणि सुधारकांची थोर परंपरा असताना, सत्तेत बसलेली माणसे अशा भोंदू बाबांच्या पाया पडतात, हे लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटले. भास्कर जाधव यांनी थेट मंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या भोंदूगिरीला खतपाणी घालणार्‍यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत सरकारची लाज काढली.

Opposition aggressive in the Legislative Assembly over the fraudster Ashok Kharat case, criticism from Bhaskar Jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *