पंकजाताईंचा ब्रेक
विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, तर विधान परिषदेत जाण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो. विधान परिषदेत कोणाला पाठवायचे आणि कोणाला नाही, हे पक्षश्रेष्ठींच्या हातात असते. काही नेत्यांना त्यासाठी बरीच वाट पाहावी लागते. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे अशीच वाट पाहून थकल्या आहेत. परळी-वैजनाथ विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी अनपेक्षित पराभव केल्यापासून त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या. पक्षाने आपल्याला विधान परिषदेत जाण्याची संधी द्यावी, ही त्यांची अपेक्षा होती. दोन वेळा विधान परिषदेसाठी अर्ज भरण्यास सांगून शेवटच्या दहा मिनिटांत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. विधान परिषदेच्या आशेवर त्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींमुळे त्या अस्वस्थ झाल्या आहेत. अजितदादा पवार यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेऊन आपल्यासह नऊ जणांना मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यात धनंजय मुंडे यांचा समावेश असल्याने पंकजाताईंवर भाजपाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणली. भाजपाच्या पाठिंब्याने आपला विरोधक आणि चुलतभाऊ मंत्री होऊ शकतो पण आपण भाजपात असूनही मंत्रीपद दूरच पण साधी विधान परिषदही मिळत नसेल, तर पंकजाताईंवर अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. आपल्या जीवनात झालेल्या संस्कारानुसार त्याच वाटेवर आहे की नाही? हे तपासून पाहण्याची त्यांना गरज वाटू लागली आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणातून एक-दोन महिन्यांसाठी ब्रेक घेण्याचे ठरविले आहे. या कालावधीत त्या कोणत्याही राजकीय घडामोडीवर भाष्य करणार नाहीत आणि प्रतिक्रियाही देणार नाहीत. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून पक्षाने विधान परिषद नाकारुन त्यांच्या राजकीय हालचालींना ब्रेकच लावलेला आहे. त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असली, तरी या पदाची त्यांना अभिलाषा नाही आणि संघटनेत काम करण्यात स्वारस्य नाही. राज्य सरकारमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यातील वाटचाल कशी करायची, यावर विचार करण्यासाठी त्यांनी ब्रेक घेण्याचे ठरविले असल्याचे दिसते.
जागा जाणार
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हा विधानसभा मतदारसंघातून दिवंगत गोपीनाथ मुंडे निवडून येत असत. हाच मतदारसंघ पंकजाताईंनी निवडला. सन २०१४ साली त्या याच मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. सन २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करणारे धनंजय मुंडे राज्यात मंत्री झाले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार आहे. अजितदादा पवार यांनी ९० जागा लढविण्याची घोषणा केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या (जिंकलेल्या) ५५ आणि काँग्रेसने जिंकलेल्या ४४ जागांचा समावेश आहे. काँग्रेसच्या जागा बाजूला ठेवल्या, तरी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या जागांवरील हक्क कदापि सोडणार नाहीत. साहजिकच परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यात जमा आहे. गोपीनाथ मुंडे निवडून येत असलेली आणि त्यांचे वारस म्हणून लढविलेली जागा भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याने पंकजाताई यांच्यावर अंतर्मुख होण्याची वेळ आली. त्यासाठी त्यांना ब्रेक हवा आहे. त्यांच्या या पावित्र्याची दखल महाराष्ट्रातील भाजपाचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांना घेणे भाग पडले. पक्षातील वरिष्ठ नेते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतील, असे फडणवीस यांनी लागलीच म्हटले आहे. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या असून, त्या आमच्यापेक्षा मोठ्या असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. पक्षातील काही नेत्यांशी संघर्ष असल्याचे त्यांनी मान्य केले. जेव्हा जेव्हा पंकजाताईंनी आक्रमक झाल्या तेव्हा भाजपाच्या नेत्यांनी अशाच प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. मूळात त्या नाराज असल्याची दखल घेतली गेली नाही उलट भागवत कराड यांना राज्यसभा, तर रमेश कराड यांना विधान परिषद देण्यात आली. पंकजाताईंनी ही बाब पत्रकार परिषदेत अधोरेखित केली. पक्षाच्या आदेशानुसार दोन वेळा आपण विधान परिषदेसाठी शेवटच्या दहा मिनिटांत अर्ज भरला नाही. अशा परिस्थितीत आपण पक्षविरोधी कृत्य कसे केले? असा सवाल त्यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाची जाणीव भाजपा नेतृत्वाला राहिली नाही आणि आपल्याला डावलले जात असल्याचा सल पंकजाताईंना सतत बोचत आहे. आपलंच काही चुकत आहे काय? याचा शोध घेण्यासाठी, विचार करण्यासाठी त्यांनी ब्रेक घेण्याचे ठरविले असल्याचे दिसते.
पक्षाची चिंता
महाराष्ट्रात २०१९ पासून मोठ्या राजकीय उलथापालथी सुरू आहेत. सन २०१९ मध्ये झालेला पहाटेचा शपथविधी, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार, अडीच वर्षानी एकनाथ शिंदेंचे बंड झाले. अजितदादा पवारांचे बंड चर्चेत असताना पंकजाताई काँग्रेसमध्ये जाणार, भाजपातही फूट पडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे स्वागत करण्याची तयारी दर्शविली होती. काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिला. खोट्या बातम्या दाखवणाऱ्या वृत्तवाहिनीबद्दल संताप व्यक्त करुन कायदेशीर लढण्याचा इशारा देत त्यांनी भाजपा सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्या शिवसेनेत जाणार असल्याचे बोलले गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनीही त्यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांच्याशीही त्यांचे संबंध चांगले आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांची त्या भेट घेतात आणि बोलतात. यावरुन त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा होत असते. आपण कधीही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे भेटले किंवा पाहिले नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीनेही त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. त्यांनी मनातली खदखद मनातली खदखद व्यक्त केली. अनेक पदांबाबत चर्चा सुरू होते. त्या पदावर नियुक्त होईल, असे सांगितले जाते. त्याच्या बातम्या येतात. परंतु, नियुक्ती होत नाही. मग मी पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात. परंतु, यात माझा काहीच दोष नाही. असा दावा त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही. उद्या पंडित दीनदयाल उपाध्याय व अटलजींचा भाजपा राहिली नाही, असे म्हणण्याची वेळ येऊ नये, असे म्हणत त्यांनी प्रसंगी राजकारण सोडून देण्याचा विचारही बोलून दाखवत पक्षनेत्यांनाही अंतर्मुख होण्यास प्रवृत्त केले आहे. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर त्या अधिक स्पष्ट बोलतील आणि भूमिका स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे. ‘ब्रेक के बाद’ ची प्रतिक्षा करण्यास त्यांनी सर्वांनाच भाग पाडले आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…