राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेची सांगता झाल्यानंतर काँग्रेसने देशभर ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले असताना महाराष्ट्रात पक्षांतर्गत पेचप्रसंग उभा राहिला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका, सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून विजय, या विजयानंतरही झालेले आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानेच महाविकास आघाडी सरकार पडल्याचा निष्कर्ष शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काढला. या निष्कर्षाला काँग्रेसचेच एक नेते विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही राऊत यांच्या सुरात सूर मिळविल्याने काँग्रेस पक्षात एक संघर्ष निर्माण झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाशी दोन हात करण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले असताना महाराष्ट्रात पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याला मुख्य कारण नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक हेच आहे. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची दखल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही घ्यावी लागली. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्षावर पडदा पडणार की नाही? हाच आता महत्वाचा प्रश्न असून, पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यावर समेट घडवून आणण्याची जबाबदारी खरगे यांनी टाकली आहे.
राष्ट्रीय अध्यक्षांकडून दखल
नाशिक पदवीधर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे हे इच्छुक होते. पण, पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली. माझ्याऐवजी मुलाला उमेदवारी द्या, असे डॉ. तांबे सांगत असतानाही पक्षाने त्यांचे ऐकले नाही आणि रामायण-महाभारत सुरू झाले. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्यासह डॉ. तांबे, सत्यजित तांबे यांचे समर्थन करणारे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब यांच्यावर पक्षाने कारवाई केली. इतकेच नव्हे, तर बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेली नगर जिल्हा काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात आली. याचमुळे थोरात संतापले. पत्रकार परिषद घेऊन “आम्हाला भाजपाच्या दारात नेऊन ठेवले.” अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामाही देऊन टाकल्याने पटोले यांच्यावरील त्यांच्या नाराजीचे काळेकुट्ट ढग अधिकच गडद झाल्याची दखल खरगे यांना घ्यावी लागली. थोरात यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यावर त्यांनी जबाबदारी सोपविली. आज रविवारी पाटील मुंबईत पटोले आणि थोरात यांची स्वतंत्रपणे भेट घेणार असून, थोरात यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येणार काय? हा एक औत्सुक्याचा प्रश्न आहे.
संघर्षाला प्रथमच निमंत्रण
महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब थोरात यांनी नेहमीच शांततेची भूमिका घेतली आहे. सन १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती तेव्हा बाळासाहेब यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांनी पक्षाचा निर्णय शिरवांद्य मानून माघार घेण्याची सूचना केली होती. मात्र, मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि निवडूनही आले. त्यानंतर लागलीच ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून ते पक्षाशी निष्ठ आहेत. शरद पवार यांच्याशी चांगले संबंध असूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नाहीत. सन १९९९ मध्ये ते राज्यमंत्री झाले. सन २००३ मध्ये मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतरही त्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली नाही. नंतर २००४ ते २०१४ आणि २०१९ ते जून २०२२ या काळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण यासारखी खाती त्यांनी सांभाळली. पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडताना कधीही तक्रार केली नाही. त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद पटोले यांच्याकडे दिले गेल्यानंतरही त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन झालेल्या गोंधळानंतर पटोले यांच्याबरोबर काम करणे यापुढे अवघड असल्याच्या भावनेतूनच राजीनामा देऊन त्यांनी प्रथमच पक्षांतर्गत संघर्षाला निमंत्रण दिले.
तेव्हा कारवाई केली नाही!
देशात भाजपाविरोधी वातावरण निर्मिती करण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ पदयात्रा काढल्यानंतर आता ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान यशस्वी करण्याचे जबाबदारी प्रदेश काँग्रेसवर आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका, त्यानंतर पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकांची तयारी केली जात असताना पटोले-थोरात संघर्ष पक्षाला परवडणारा नाही. या पार्श्वभूमीवर प्रभारी एच. के. पाटील यांच्यावर समेट घडवून आणण्याची मोठी जबाबदारी आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढवून काँग्रेसला राज्यात नंबर एकचा पक्ष बनविण्याची घोषणा केली होती. त्यांनी आता स्वबळाची भाषा सोडून दिली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार असताना त्यांनी तांबे पित्रापुत्र, नगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब सांळुके यांच्यावर कारवाई केली. पण, ती आता अंगलट येण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला, तर दुसर्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप विजयी झाले होते. त्यावेळी आमदारांनी पक्षादेश पाळला नाही. काहींनी भाजपालाही मदत केली तेव्हा पटोले यांनी या आमदारांवर कोणतीही कारवाई केली नाही. शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मतदान असताना माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदार विधानसभेत अनुपस्थित राहिले तेव्हाही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन त्यांनी कारवाईचा बडगा उचलून पक्षात संघर्षाला त्यांनीही निमंत्रण दिले. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार पडल्याची चर्चाही होत आहे. यातून पक्षाची प्रतिमा डागाळल्याने राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांना दखल घेणे भाग पडत आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…